४० वे.बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२६
सामाजिक न्याय, जातनिहाय जनगणना, EVM, TET-NEETसह विविध प्रश्नांवर होणार मंथन
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव
ऑल इंडिया बॅकवर्ड (SC, ST, OBC) अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन (BAMCEF) आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ४० वे राज्य अधिवेशन रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनातील प्रमुख विषय, सामाजिक प्रश्न आणि संघटनेची आगामी भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेचे नेतृत्व BAMCEFचे राज्याध्यक्ष डॉ. संजय गायकवाड यांनी केले. यावेळी ॲड. सुजाता चौदांते, भारत मुक्ती मोर्चा महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा ज्योती मिसाळ, BAMCEFचे फुलटायमर प्रा. मनोज लोहे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त ACP रियाजुद्दीन देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजयोग लॉन्स येथे अधिवेशन
हे राज्य अधिवेशन रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत राजयोग लॉन्स मंगल कार्यालय, चिनार गार्डनच्या बाजूला, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध आंबेडकरी शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी BAMCEFचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय मनू, मिलिंद टिपणीस, सुरेश खोपडे आणि उत्तम सोनकांबळे उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ‘महिलांचे राष्ट्रव्यापी संघटन उभारल्याशिवाय महिलांच्या समस्यांचे समाधान होऊ शकत नाही – एक चिंतन’ या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये उषा थोरात, ॲड. शबनम तोफेल बेग, ज्योती मिसाळ, हेमलता पाटील, ॲड. पूनम भोईर, डॉ. पंचशीला मोहोड, सरोज पैटणे आणि ॲड. छायाताई बलखंडे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायावर मंथन
अधिवेशनातील दुसऱ्या महत्त्वाच्या सत्रात जातनिहाय जनगणना, OBC समाजाचे प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच EVM व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, TET व NEET परीक्षांमधील सामाजिक न्यायाचे प्रश्न, स्वतंत्र मतदारसंघ, जातनिहाय वर्गीकरण, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण आदी मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे.
संघटनेच्या आगामी सामाजिक आंदोलनांची दिशा, संविधानिक अधिकारांचे संरक्षण, समान प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक संधी याबाबतही अधिवेशनात भूमिका निश्चित केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून BAMCEFचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, लोकशाही, समान प्रतिनिधित्व आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी आगामी काळातील संघटनात्मक व सामाजिक कार्यक्रमांची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी गोरखनाथ वेताळ, मंगला थोरात आणि डॉ. संजय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
