शौर्यवीर प्रतिष्ठान ढोल पथक एकाच वेळी दोन ठिकाणी देणार सलामी
जळगाव शहरात प्रथमच अनोखा प्रयोग
जळगाव, दि. १६ | प्रतिनिधी
जळगाव शहरातील सुप्रसिद्ध शौर्यवीर प्रतिष्ठान ढोल पथक यंदाच्या दहीहंडी उत्सवात एकाच वेळी दोन ठिकाणी ढोलवादनाची सलामी देणार आहे. शहरात प्रथमच अशा पद्धतीचा अनोखा प्रयोग करण्यात येणार असून, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन्ही ठिकाणी दहीहंडीचा उत्साह रंगणार आहे.
शौर्यवीर प्रतिष्ठानच्या वतीने सुभाषचंद्र बोस चौकातील दहीहंडी तसेच जी.एस. ग्राउंडवरील महिलांची दहीहंडी येथे एकाच वेळी ढोल पथकाची सलामी देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिन्मय नाझरकर यांनी ही माहिती दिली.
पाच वर्षांपासून पारंपरिक वाद्यांचा जागर
शौर्यवीर प्रतिष्ठान ढोल पथक मागील पाच वर्षांपासून जळगाव शहरातील विविध सण-उत्सवांमध्ये ढोलवादनाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पारंपरिक वाद्यांचा वारसा जपत तरुणाईला या कलेशी जोडण्याचे काम प्रतिष्ठानकडून केले जात आहे.
ढोलवादनाच्या माध्यमातून शहरातील विविध उत्सवांमध्ये सहभागी होत तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्याबरोबरच पारंपरिक संस्कृतीशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या उपक्रमांकडे तरुणाईचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे अध्यक्ष चिन्मय नाझरकर यांनी सांगितले.
जळगावकरांना सहभागाचे आवाहन
एकाच वेळी दोन ठिकाणी ढोल पथकाची सलामी देण्याचा हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा आणि शौर्यवीर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन अध्यक्ष चिन्मय नाझरकर यांनी केले आहे.
सुभाष चौकात ७५ मुले, १५ मुलींचा सहभाग
सुभाष चौक मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कार्यक्रम होणार आहे. या दहीहंडीमध्ये ७५ मुले आणि १५ मुली, अशा एकूण ९० गोविंदांचा सहभाग राहणार आहे.
जी.एस. ग्राउंडवर महिलांची दहीहंडी
दरम्यान, जी.एस. ग्राउंडवरील महिलांच्या दहीहंडी उत्सवातही याच वेळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथे ७० मुले आणि २० मुली, अशा एकूण ९० सहभागींचा सहभाग राहणार आहे. दोन्ही ठिकाणी शौर्यवीर प्रतिष्ठान ढोल पथकाच्या सलामीमुळे उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.
संपर्क : चिन्मय नाझरकर – ९०२८३२०४७२
