धरणगावातील स्थलांतरित कामगारांना HIV/AIDS जनजागृतीचे धडे
इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0 अंतर्गत वल्लभ जिनिंगमध्ये मार्गदर्शन; मोफत HIV तपासणीसाठी प्रोत्साहन
धरणगाव प्रतिनिधी | प्रशांत शिंदे
धरणगाव : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0 अंतर्गत वल्लभ जिनिंग, जळगाव रोड, धरणगाव येथे स्थलांतरित कामगारांसाठी एचआयव्ही/एड्स जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथील ICTC केंद्र आणि राष्ट्र विकास मायग्रंट टी.आय. प्रोजेक्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कॉटन जिनिंगमध्ये कार्यरत स्थलांतरित कामगारांना एचआयव्ही/एड्सविषयी शास्त्रीय माहिती देण्यात आली. एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय तसेच शासनाकडून उपलब्ध असलेल्या मोफत उपचार व आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
यासोबतच एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध व नियंत्रण) कायदा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. बाधित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर संरक्षण, त्यांचे हक्क आणि गोपनीयतेचा अधिकार याविषयी कामगारांना जागरूक करण्यात आले.
बॅनर व पोस्टरच्या माध्यमातूनही एचआयव्ही प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच इच्छुक कामगारांनी HIV तपासणी करून घ्यावी, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
जिनिंग व्यवस्थापनासह आरोग्य विभागाचा सहभाग
कार्यक्रमाला जिनिंगचे मालक हरीश अग्रवाल, मॅनेजर सुशांत खेळे, सुपरवायझर दीपक महाजन व प्रकाश महाजन यांच्यासह ग्रामीण रुग्णालय धरणगावचे ICTC समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे, राष्ट्र विकास Migrant T.I. प्रोजेक्टचे प्रोजेक्ट मॅनेजर अमोल सूर्यवंशी, ORW राहुल सूर्यवंशी, राहुल पवार तसेच जिनिंगमधील कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्यामुळे जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. स्थलांतरित कामगारांमध्ये HIV/AIDS संदर्भातील गैरसमज दूर करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
