शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
बालाजी पेठेतील पल्सर चोरीचा छडा; सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून संशयित एरंडोल बसस्थानकातून ताब्यात
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शनिपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बालाजी पेठ परिसरातून चोरीला गेलेल्या बजाज पल्सरचा तपास करताना पोलिसांनी एका संशयिताला एरंडोल बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून दोन बजाज पल्सर आणि एक होंडा युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
घराबाहेर गेले असताना मोटारसायकल लंपास
दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी बालाजी पेठ परिसरातील रहिवासी निलेश प्रकाश बोरसे (वय २७) यांची बजाज पल्सर मोटारसायकल चोरीला गेली होती. बोरसे हे बाहेरगावी गेले होते. १८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणातून संशयिताचा शोध
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी डीबी पथकाला चोरीच्या मोटारसायकलसह आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी बालाजी पेठ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) याला एरंडोल बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
चौकशीत तीन मोटारसायकली हस्तगत
संशयिताची चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासात त्याच्या ताब्यातून बजाज कंपनीच्या दोन पल्सर आणि होंडा कंपनीची एक युनिकॉर्न, अशा तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे शहरातील मोटारसायकल चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे तसेच सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे करीत आहेत.
