सावदे येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी; ५५ हजारांची रोकड लंपास
कुटुंब राजस्थानला खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी गेलेले असताना चोरट्यांचा डाव; पाळधी दुरक्षेत्रात गुन्हा दाखल
एरंडोल तालुका प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यातील सावदे प्र. चा. येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्याच्या पाळधी दुरक्षेत्रात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कुटुंब राजस्थानला गेले; घर होते बंद
सावदे येथील रहिवासी गोपाल काशिनाथ पवार हे आपल्या कुटुंबासह १८ ऑगस्ट रोजी राजस्थान येथील खाटूश्याम बाबा यांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.
२१ ऑगस्ट रोजी रात्री १० ते २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली ५५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
शेजाऱ्यांना चोरीची माहिती
२२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या मुक्ताबाई पवार यांच्या निदर्शनास घराचा कडीकोयंडा तुटलेला आढळला. त्यांनी तत्काळ गोपाल पवार यांचे भाऊ शरद काशिनाथ पवार यांना घटनेची माहिती दिली.
शरद पवार व नातेवाईकांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाटाचे कुलूप तुटलेले आणि त्यातील रोख रक्कम गायब असल्याचे आढळून आले.
इतर वस्तूंचा तपशील परतल्यानंतर स्पष्ट होणार
फिर्यादी शरद काशिनाथ पवार (वय ३८, रा. सावदे प्र. चा.) यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाणे, पाळधी दुरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालक गोपाल पवार हे राजस्थानच्या प्रवासावर असल्याने घरातील इतर वस्तू किंवा दागिने चोरीस गेले आहेत का, याचा तपशील ते परतल्यानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
