पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार; ठाण्यातून सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबरनाथ येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची महत्त्वपूर्ण बैठक; पत्रकारांच्या हक्क-अधिकारांसाठी संघटितपणे लढण्याचा संकल्प
अंबरनाथ | प्रतिनिधी – सुरेश जगताप :
पत्रकारांच्या हक्क, अधिकार आणि विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासोबतच ठाणे जिल्ह्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची भक्कम बांधणी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ येथील शासकीय विश्रामगृहात रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालली.
ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून पत्रकार बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसह सदस्य नोंदणी अभियानावर विशेष भर देण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी सदस्य नोंणीचे अर्ज भरून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
पत्रकारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य तथा ठाणे जिल्हा सुप्रिमो गौतम वाघ होते. महाराष्ट्र सहसंघटक सुरेश जगताप यांनी प्रास्ताविक करताना ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क व अधिकार, संघटनेची आवश्यकता तसेच आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पत्रकारांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या अडचणी, पत्रकारांच्या हिताचे प्रश्न आणि विविध समस्या यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी पत्रकारांनी संघटितपणे पुढे येण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
‘एकजुटीतूनच प्रश्नांना ताकद’
“पत्रकार एकत्र आले तरच पत्रकारांच्या प्रश्नांना ताकद मिळेल. संघटना मजबूत झाली तरच हक्क आणि अधिकारांसाठीचा संघर्ष अधिक प्रभावी होईल,” या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची मजबूत संघटनात्मक उभारणी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला एका मजबूत व्यासपीठावर आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
उपस्थित पत्रकारांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदस्य नोंदणी अभियानाला मिळालेला प्रतिसाद हा संघटनात्मक बांधणीसाठी सकारात्मक पाऊल असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग
बैठकीस गौतम गवई, संजय साळवे, प्रशांत ढोणे, रजनीकांत गायकवाड, जगन्नाथ जावळे, सतीश आहिरे, सलीम मन्सूरी, राजदीप जगताप, संतोष क्षेत्रे, राजू दोंदे, देवानंद पाढेन यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
