ब्रिटिशांनी दिलेल्या दोन पॅसेंजर गाड्या भुसावळ-मुंबई भारत सरकार पुन्हा सुरू करणार का?
खान्देशच्या अस्मितेचा सवाल; भुसावळ-मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी ‘खान्देश हित संग्राम’चा एल्गार
प्रतिनिधी : भुसावळ
“ब्रिटिशांनी आम्हाला दिलेल्या दोन पॅसेंजर गाड्या भुसावळ-मुंबई भारत सरकार पुन्हा सुरू करणार का?” असा सवाल उपस्थित करत खान्देश हित संग्रामच्या वतीने खान्देशच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
खान्देश वाशियांचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, “आम्ही खान्देशी म्हणून मुका मार सहन करीत आहोत. भारत सरकारने मुंबई-भुसावळ रोज सकाळी आणि रात्री पॅसेंजर दिलेल्या होत्या; परंतु या दोन्ही गाड्या कायमच्या बंद करण्यात आल्या. त्यानंतरही नवे नियोजन करून प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी सुविधा कमी केल्या जात आहेत,” अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
‘मुंबई-नांदेड एक्स्प्रेसही आमच्या हक्काची’
खान्देश हित संग्रामच्या प्रवक्त्यांनी मुंबई-नांदेड एक्स्प्रेसच्या प्रश्नावरही भूमिका मांडली. “ही गाडी खान्देशच्या हक्कासाठी मागितली गेली होती. आज ती खान्देशातून धावते; मात्र तिचा योग्य लाभ खान्देशातील प्रवाशांना मिळत नाही,” असा आरोप करण्यात आला.
तसेच कोविड काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झाल्या नसल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला. खान्देशातील नागरिकांना रेल्वे, पाणी आणि रोजगारासाठी सातत्याने संघर्ष करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
‘खान्देशी नेत्यांना फक्त इतर गाड्यांचा थांबा हवा’
खान्देशातील लोकप्रतिनिधींवरही या वेळी टीका करण्यात आली. “खान्देशातील नेत्यांना फक्त इतर गाड्यांचे त्यांच्या मतदारसंघात थांबे मिळवून घेण्यात रस आहे. मात्र खान्देशच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे,” असा आरोप करण्यात आला.
“थांबा मिळाला की काय डोळे ताणून पाहता? अशा प्रकारे खान्देशचा विकास होणार नाही. खान्देशच्या हक्कासाठी ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे,” असेही प्रवक्त्यांनी नमूद केले.
‘खान्देशी नागरिकांनी आता उद्रेक करावा’
खान्देशच्या प्रश्नांवर सातत्याने दुर्लक्ष होत असल्यास नागरिकांनी संघटित होऊन आंदोलन उभारावे, असे आवाहन करण्यात आले. “खासदार-आमदारांना घरात कार्यकर्ता मेळावे घेण्यापेक्षा खान्देशच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तरदायी धरले पाहिजे. काम होत नसेल तर मोर्चा काढला पाहिजे. त्यांच्या घरांवरही मोर्चा काढला पाहिजे,” असा इशारा देण्यात आला.
“काही आभाळ हेपले म्हणतील, बाहेरच्या लोकांना काय कळतं; मात्र खान्देशातील नागरिकच आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. रेल्वे, पाणी आणि रोजगारासाठी हा संघर्ष सुरूच राहील,” अशी भूमिका खान्देश हित संग्रामचे प्रवक्ते यांनी व्यक्त केली.
