बहिणाबाईंच्या कविता म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा अजरामर अभंग
प्रा. डॉ. जतीन मेढे : कला व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त अभिवादन
भुसावळ | संघरत्न सपकाळे :
“निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही केवळ मनोरंजनासाठीची रचना नसून मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा अजरामर अभंग आहे,” असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले.
कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग व लेवा गणबोली भाषा अभ्यास व संवर्धन केंद्राच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. जतीन मेढे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभागातील प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्यिक योगदानाचा परिचय करून दिला.
बहिणाबाईंच्या कवितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना प्रा. डॉ. मेढे म्हणाले की, “बहिणाबाईंची कविता म्हणजे मराठी साहित्यातील एक फार मोठा चमत्कार आहे. महाराष्ट्रातील प्रतिभावंत साहित्यिक प्र. के. अत्रे यांनी त्यांच्या काव्यरचनेला ‘मोहरांचा हंडा’ आणि ‘बावन्न कशी सोने’ अशा शब्दांत गौरविले. यातूनच बहिणाबाईंच्या कवितेचे अनमोल साहित्यिक मूल्य अधोरेखित होते.”
लोकजीवन, निसर्ग आणि मानवी भावविश्वाचा अनोखा संगम
शाळेची कोणतीही पायरी न चढलेल्या बहिणाबाईंच्या कवितेचा शालेय अभ्यासक्रमापासून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापर्यंत समावेश झाला, ही त्यांच्या साहित्यिक प्रतिभेची मोठी पावती आहे. त्यांच्या कवितेत ग्रामीण जीवन, निसर्ग, कष्टकरी माणूस, कौटुंबिक नाती आणि सुख-दुःखांचे वास्तव यांचे अत्यंत सहज आणि प्रभावी चित्रण आढळते.
“मानवी जीवनाची वाट सुख-दुःखांच्या किनाऱ्यांनी निर्माण झालेली असते. या सुख-दुःखांना सकारात्मकतेने आणि आनंदाने कसे सामोरे जावे, याचा विचार व मार्गदर्शन बहिणाबाईंची कविता मानवाला देते. त्यामुळे त्यांची कविता ही केवळ साहित्यकृती न राहता माणसाच्या सुख-दुःखांना समजून घेणारी जीवनानुभवांची ओवी ठरते,” असेही प्रा. डॉ. मेढे यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपप्राचार्य मुकेश चौधरी, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे, प्रा. डॉ. दिनेश पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
