४४ वर्षांपासून पिकांचे नुकसान; अन्यायग्रस्त शेतकरी शांताराम कोळी यांचे आमरण उपोषण
बोदवड तहसील कार्यालयासमोर उपोषण; ८२ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा, कर्जमाफीसह नुकसानभरपाई व तीन मुलांना शासकीय नोकरी देण्याची मागणी
बोदवड | प्रतिनिधी :
शेलवड शिवारातील गट क्रमांक ३०४/१ मधील शेतीचे गेल्या ४४ वर्षांपासून लघुसिंचन विभागाच्या तलावातील पाण्यामुळे सातत्याने नुकसान होत असल्याचा आरोप करत अन्यायग्रस्त शेतकरी शांताराम कोळी यांनी बोदवड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या कालावधीत आपल्या पिकांचे ८२ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा कोळी यांनी निवेदनातून केला आहे.
तलावाच्या पाण्यामुळे ४४ वर्षांपासून शेतीचे नुकसान
शांताराम कोळी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतात लघुसिंचन जिल्हा परिषदेच्या तलावाचे पाणी साचून गेल्या ४४ वर्षांपासून पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून सध्या ३० लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. कर्जाचे व्याज व हप्त्यांसाठी दरमहा ४० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
लघुसिंचन विभागाने शेतीचे नुकसान झाल्याचे मान्य केले असले तरी नुकसानभरपाई देण्यासाठी आवश्यक तरतूद नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा कोळी यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील जलसंधारण अधिकाऱ्यांना विशेष अधिकार देऊन नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पीकविमा, ज्वारी खरेदीबाबतही तक्रारी
सन २०२४-२५ मध्ये अतिपावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने १०० टक्के नुकसान झाल्याचा पंचनामा केला असतानाही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पीकविमा दावा नाकारल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे.
तसेच सन २०२३-२४ मधील शासकीय ज्वारी खरेदी प्रक्रियेत बोदवड को-ऑप. परचेस अँड सेल्स युनियन लिमिटेड, बोदवड यांनी आपली ज्वारी खरेदी केली नाही आणि उलट बदनामी केल्याची तक्रारही संबंधित शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली असल्याचे निवेदनात नमूद आहे.
शिवभोजन केंद्राचे बिलही दोन वर्षांपासून प्रलंबित
शांताराम कोळी हे बोदवड येथे ‘जय महाराष्ट्र भोजनालय’ या नावाने शिवभोजन केंद्र चालवत होते. ऑक्टोबर २०२४ पासून केंद्राच्या ठिकाणी अॅप कार्यरत नसल्याने नवीन जागेत स्थलांतर करण्यासाठी अर्ज करूनही दोन वर्षांनंतरही परवानगी मिळालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवभोजन केंद्राचे गेल्या दोन वर्षांपासून बिल प्रलंबित असून, १६ महिन्यांपासून केंद्र बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा कोळी यांनी केला आहे.
शेतरस्त्यापासून ४४ वर्षांपासून वंचित
लघुसिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जिल्हा परिषदेमार्फत शेतरस्ता संपादित करण्यात आला; मात्र त्याबदल्यात पर्यायी शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे कोळी यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे गेल्या ४४ वर्षांपासून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा दावा
सततच्या नुकसानीमुळे तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून मुलांचे शिक्षणही अर्धवट राहिले, अशी व्यथा कोळी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या तीन मुलांना शासकीय सेवेत सामावून घेऊन कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सन २०२४ मध्ये जिल्हा परिषद, जळगाव कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करूनही शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून आपल्याला वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मनरेगा कामातील विलंबाची चौकशी करण्याची मागणी
दि. ४ जुलै २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत तलावातील गाळ शेतात टाकण्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, पंचायत समिती बोदवड स्तरावरून या कामास हेतुपुरस्सर विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणीही उपोषणकर्त्याने केली आहे.
शेतीचे नुकसान, कर्जबाजारीपणा, पीकविमा, शासकीय खरेदी, शेतरस्ता, शिवभोजन केंद्र आणि पुनर्वसन अशा विविध प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन न्याय मिळावा, अशी मागणी शांताराम कोळी यांनी केली आहे.
