धरणगाव पी.आर. हायस्कूलमध्ये ‘श्रावणधारा’ काव्यवाचन सोहळा उत्साहात
पावसाच्या कवितांतून विद्यार्थ्यांच्या मनावर साहित्याची नवी पालवी
धरणगाव प्रतिनिधी : अजय बाविस्कर
धरणगाव : येथील पी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात ‘श्रावणधारा’ या संकल्पनेतून पावसाच्या कवितांचा काव्यवाचन सोहळा उत्साहपूर्ण आणि साहित्यिक वातावरणात पार पडला. विविध कवींनी साकारलेल्या पावसाच्या कवितांचे विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी सादरीकरण यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात मंगेश पाडगावकर यांच्या ‘टप टप थेंब वाजती’ या गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील होते. मंचावर पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी आणि मराठी विभागप्रमुख डॉ. बापू शिरसाठ उपस्थित होते. मुख्याध्यापकांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर बालकवींच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ या अमर ओळींनी वातावरण श्रावणमय झाले.
प्रास्ताविकात डॉ. बापू शिरसाठ यांनी पावसाकडे केवळ एका दृष्टिकोनातून न पाहता त्याची विविध रूपे विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उलगडावीत, हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी बालकवी ठोंबरे यांच्या श्रावण मास, निर्झरास, फुलराणी, औदुंबर, बा. भ. बोरकर यांच्या घन येती घिरट्या घालिती, ग. दि. माडगूळकर यांच्या घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा, ना. धों. महानोर यांच्या नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नभ मेघांनी आक्रमिले, कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो, भा. रा. तांबे यांच्या पिवळे तांबूस ऊन कोवळे, शांता शेळके यांच्या वादळ वारं सुटलं गो, मंगेश पाडगावकर यांच्या श्रावणात घन निळा बरसला आणि आरती प्रभू यांच्या ये रे घना आदी कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.
या कवितांमधून विद्यार्थ्यांनी पावसाचा निसर्गशृंगार, हिरवाई, मानवी भावविश्व तसेच शेतकऱ्याच्या डोळ्यांतील पावसाची प्रतीक्षा जिवंत केली. प्रत्यक्षात पाऊस नसतानाही काव्यवाचनामुळे उपस्थितांच्या मनात मात्र श्रावणाच्या सरी बरसत असल्याचा अनुभव आला.
यावेळी पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांनी, “मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांना निसर्गाकडे वळवण्यासाठी कविता हे सर्वांत सुंदर माध्यम आहे. पाऊस फक्त भिजवत नाही, तर घडवतोही,” असे सांगितले.
शिक्षक गोपाल चौधरी यांनी ‘असा रंगारी श्रावण’ ही कविता गाऊन उपस्थितांची मने जिंकली. त्रिवेणी पाटील, उर्मिला वाणी, रीना सोनवणे, विभा शिरसाठ, हर्षदा गोरखा, भावना सोनवणे, यशस्वी मुजगे, आराध्या पवार, प्रथमेश माळी, प्रशांत पाटील, डिंपल बडगुजर, गुंजन कोळी, इशिता पाटील, भाग्यश्री कोळी, आरोही भील, उपासना पाटील, तेजस्विनी पाटील, हर्षाली पाटील, प्रांजल धनगर आदी विद्यार्थ्यांनी पाऊस व निसर्गावर आधारित कविता सादर केल्या.
सहभागी विद्यार्थ्यांचा शिक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते पेन देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी, “अशा उपक्रमांतूनच उद्याचे साहित्यिक घडतील,” अशी भावना व्यक्त करत मराठी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बेलदार यांनी केले, तर आभार संदीप घुगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
