नाहाटा महाविद्यालयात ‘संज्ञापन कौशल्ये’ विषयावर मार्गदर्शन
भुसावळ : येथील कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संज्ञापन कौशल्ये समितीच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी ‘संज्ञापन कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील कॅप्टन डॉ. राजेंद्र आर. राजपूत उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी आणि समितीप्रमुख प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना संज्ञापन कौशल्ये, व्यावहारिक कौशल्ये, जीवनातील संज्ञापनाचे महत्त्व, परिणामकारक संवादासाठी आवश्यक कौशल्ये, भाषा, देहबोली, समयसूचकता आणि व्यवस्थापन कौशल्ये याबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. यशस्वी जीवनासाठी संवादकौशल्य महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्ये विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील विविध समित्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि त्याचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. यशस्वी करिअरसाठी संज्ञापन कौशल्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीप्रमुख प्रा. डॉ. रश्मी शर्मा यांनी केले. महाविद्यालय व संज्ञापन कौशल्ये समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन प्रा. एकता बजाज यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. पी. ए. आहिरे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ममता पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील यांचे सहकार्य लाभले. समिती सदस्य प्रा. डॉ. के. पी. पाटील, प्रा. डॉ. मनोज जाधव, प्रा. डॉ. सचिन राजपूत, प्रा. स्वाती शेळके आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रा. डॉ. पी. एच. इंगोले, प्रा. भूषण चौधरी, प्रा. अंकित जयस्वाल, प्रा. ललिता पाटील, प्रा. श्रद्धा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
