मरी माता यात्रेत संस्कार, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा अनुकरणीय आदर्श
कानळदा येथील कुंभार समाजाचा स्तुत्य उपक्रम; तमाशाऐवजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन, हजारो भाविकांची उपस्थिती
कानळदा, ता. जि. जळगाव | प्रतिनिधी :
कानळदा येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी मरी माता यात्रेचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः कुंभार समाज बांधवांचा यात्रेच्या आयोजनात अग्रगण्य सहभाग राहिला. मात्र यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य केवळ उत्सवाच्या उत्साहात नव्हते, तर संस्कार, संस्कृती, भक्ती आणि सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश देणाऱ्या उपक्रमात होते.
दरवर्षी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या लोकनाट्य तमाशाऐवजी यंदा कुंभार समाज बांधवांनी सांप्रदायिकतेचा प्रचार-प्रसार, भारतीय हिंदू संस्कृतीचे जतन आणि संस्कारमूल्यांची जोपासना या उद्देशाने ह. भ. प. परमपूज्य स्वामी विद्यानंदजी सागर महाराज बाबा, लातूर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले. या भक्तिमय सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आबालवृद्धांपासून तरुणाईपर्यंत सर्वच ग्रामस्थांनी या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला. कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि सकारात्मक विचारांचा जागर करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
मनोरंजनाऐवजी संस्कारांचा विधायक पर्याय
आजच्या काळात उत्सव आणि यात्रांच्या निमित्ताने अनावश्यक धांगडधिंगा, गाण्यांचा गजर तसेच त्यातून वाद-विवाद आणि भांडणांना खतपाणी मिळण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कानळदा येथील कुंभार समाजातील अबालवृद्ध आणि तरुण पिढीने एकविचाराने पुढाकार घेत मनोरंजनाला पर्याय म्हणून संस्कारक्षम आणि विधायक उपक्रम समाजासमोर ठेवला आहे.
‘केवळ शिक्षणाने नव्हे, तर संस्काराने माणूस मोठा होतो,’ हा विचार कुंभार समाज बांधवांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केला. यात्रेच्या माध्यमातून केवळ मनोरंजन न करता भक्ती, संस्कृती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
ग्रामपंचायतीतर्फे कुंभार समाजाचा गौरव
या स्तुत्य आयोजनाबद्दल कानळदा ग्रामपंचायतीच्या वतीने कुंभार समाज बांधवांचा छोटेखानी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी समाजबांधवांचे शब्दसुमनांनी अभिनंदन करून गुलाबपुष्प देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कानळदा गावाचे सरपंच पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांनी कुंभार समाज बांधवांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मते, यंदाच्या यात्रेतून गावात एक नवा, सकारात्मक आणि अनुकरणीय पायंडा निर्माण झाला असून, भविष्यातील विविध उत्सव आणि सामाजिक उपक्रमांसाठी तो निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
समाजासाठी चांगला विचार करणे ही सुरुवात असते; मात्र तो विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हीच खरी समाजसेवा आहे. कानळदा येथील कुंभार समाजाने यंदाच्या मरी माता यात्रेत हा विचार कृतीत उतरवत संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची वाट दाखवली आहे.
या विधायक, संस्कारक्षम आणि अनुकरणीय उपक्रमाबद्दल कुंभार समाज बांधवांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, अशाच उपक्रमांतून गावाची संस्कृती, संस्कार आणि सामाजिक एकता अधिक बळकट व्हावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
संपर्क : पुंडलिक तुळशीराम सपकाळे, सरपंच, कानळदा
