अंगणवाडी भरती वादाच्या भोवऱ्यात; स्थानिक महिलांना डावलल्याचा आरोप
बाहेरील गावातील उमेदवाराला प्राधान्य दिल्याचा दावा; चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी
यावल | प्रतिनिधी : अक्षय वाघ
यावल येथील अंगणवाडी भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक पात्र महिला उमेदवारांना डावलून बाहेरील गावातील उमेदवाराला प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची जिल्हास्तरावर सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे यावल तालुकाध्यक्ष तथा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश पांडुरंग अडकमोल यांनी तक्रारीद्वारे केली आहे.
१३ ऑगस्टला प्रथम यादी जाहीर
यावल येथील अंगणवाडी भरतीची प्रथम यादी १३ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये स्थानिक महिलांना डावलून बाहेरील गावातील महिलेचे नाव प्रथम क्रमांकावर आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पात्र महिला उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जाहीर झालेल्या यादीतील सर्व उमेदवारांचे अर्ज, मूळ कागदपत्रे आणि पात्रता निकषांची जिल्हास्तरावर सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी अडकमोल यांनी केली आहे.
तसेच उमेदवारांना देण्यात आलेले गुण नियमानुसार आणि योग्य आहेत की नाहीत, याचीही तपासणी करावी. संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
भरती स्थगित न केल्यास आंदोलनाचा इशारा
जिल्हास्तरावर अर्ज व कागदपत्रांची छाननी पूर्ण होईपर्यंत अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सतीश अडकमोल यांनी दिला आहे.
दरम्यान, तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी आणि पात्र स्थानिक उमेदवारांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.
