कुरंगी येथून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा महसूल पथकाच्या ताब्यात
खेडगाव-नांदिचे परिसरात कारवाई; तहसील कार्यालयात वाहन जमा, कागदपत्रांची तपासणी सुरू
नांद्रा (ता. पाचोरा) | प्रतिनिधी :
मौजे कुरंगी येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने खेडगाव-नांदिचे परिसरात पकडून ताब्यात घेतला. तपासणीदरम्यान सदर वाहनातून वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने महसूल पथकाने तत्काळ कारवाई केली.
पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ताब्यात घेतलेला हायवा ट्रक पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून, नियमांनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.
महसूल पथकाची धडक कारवाई
ही कारवाई पथक प्रमुख नायब तहसीलदार विनोद कुमावत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, ग्राम महसूल अधिकारी दीपक दवंगे, शिवाजी डोंगरे, लहू कोळेकर, महसूल सहाय्यक गोपाल पाटील आणि ईश्वर पाटील यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचे लक्ष
पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या हायवा वाहनाची कागदपत्रे व वाळू वाहतुकीसंदर्भातील परवानगी तपासल्यानंतर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
