रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम
४० विद्यार्थ्यांना मिळाली बहिणीची माया; २५ विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना मानले भाऊ
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
कोळगाव : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील गोपीचंद पुना पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘सजीव राखी’चा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या बांधत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण तसेच भावनिक वातावरणात साजरा केला. या उपक्रमातून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परस्पर सन्मान आणि सहकार्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि भारतीय संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. वळखंडे होते. यावेळी विद्यार्थीनींनी प्राचार्यांसह शिक्षकांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला.
४० विद्यार्थ्यांना मिळाली बहिणीची माया
विद्यालयातील ज्या सुमारे ४० विद्यार्थ्यांना सख्ख्या बहिणी नाहीत, अशा विद्यार्थ्यांना विद्यालयातील विद्यार्थीनींनी राखी बांधून बहिणीच्या प्रेमाची उणीव भरून काढली. त्याचप्रमाणे ज्या २५ विद्यार्थिनींना भाऊ नाही, त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाऊ मानून त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. त्यामुळे या उपक्रमाला भावनिक आणि सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.
रक्षाबंधनातून संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची परंपरा, त्यामागील सांस्कृतिक व भावनिक महत्त्व तसेच रक्षाबंधनाची विधीवत पद्धत याबाबत माहिती देण्यात आली. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि परस्पर संरक्षणाचे प्रतीक असून, प्रत्येक भावाने बहिणीचा आदर व सन्मान करावा आणि तिच्या सुख-दुःखात सदैव साथ द्यावी, असा संदेश देण्यात आला.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ राखी बांधण्याची परंपरा न जोपासता बंधुभाव, सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि पर्यावरण संवर्धन यांची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस. ए. वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला शिक्षिका सरिता पाटील, चारुलता पाटील आणि तृप्ती भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सजीव राखी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रक्ताच्या नात्यापलीकडे माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
