बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवासेनेचा अनोखा उपक्रम; विशेष मुलींसोबत रक्षाबंधन साजरे
धुळे | प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून युवासेना धुळे जिल्ह्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विशेष मुलींसोबत रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करण्यात आला.
बहीण-भावाच्या प्रेम, जिव्हाळा आणि संरक्षणाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण समाजातील विशेष घटकांसोबत साजरा करण्याचा उपक्रम युवासेनेने राबविला. धुळे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.
यावेळी युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मुलींकडून राखी बांधून घेतली. तसेच त्यांना मिठाई, दैनंदिन उपयोगाचे साहित्य आणि शैक्षणिक व खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे बालगृहातील मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
समाजातील उपेक्षित व विशेष घटकांशी आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांना सणाच्या आनंदात सहभागी करून घेणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक सुनील वाघ, निखिल वाघ तसेच संस्थेतील कर्मचारी यांनी सहकार्य केले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, जयेश फुलपगारे, अविनाश जोंधळे, तरबेज शेख, गोपाळ चव्हाण, सुमित चौधरी, विकास पाटील, सोमेश कानकाटे, गोलू लहामगे, जाकीर शेख, सर्वेश थोरात, जयेश नाईक, दीपक सोनटक्के, हर्षवर्धन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून रक्षाबंधनाचा सण केवळ उत्सव न राहता माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
