अवैध धंद्यांविरोधात ॲड. पंकज गोरे यांचा एल्गार; आंदोलनस्थळी पत्त्यांचा डाव, सट्ट्याचे आकडे दाखवत प्रशासनाचे वेधले लक्ष
विद्यार्थ्यांचा उपोषणाला पाठिंबा; उद्या आमदार अनिल अण्णा गोटे आंदोलनस्थळी उपस्थित राहणार
धुळे | प्रतिनिधी : धुळे शहरासह जिल्ह्यात वाढलेल्या अवैध धंद्यांना, नशेच्या पदार्थांच्या विक्रीला आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ॲड. पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला दुसऱ्या दिवशी नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी ॲड. गोरे यांनी प्रतिकात्मक पत्त्यांचा डाव मांडून आणि सट्ट्याचे आकडे दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरात सट्टा-मटका, जुगार, अवैध दारूविक्री, गांजा, गुटखा तसेच अन्य नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असून, त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होत असल्याचा दावा ॲड. पंकज गोरे यांनी केला.

पत्त्यांचा डाव मांडून अनोखे आंदोलन
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ॲड. पंकज गोरे यांनी आंदोलनस्थळी पत्त्यांचा डाव मांडला. सट्ट्याचे आकडे दाखवत शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे प्रतिकात्मक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. पत्त्यांच्या क्लबमध्ये खेळले जाणारे विविध प्रकार दाखवत तरुणाईला अवैध धंद्यांच्या विळख्यात कसे ओढले जात आहे, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरात मटका, जुगार, झन्ना-मन्ना यांसारखे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सट्टा व पत्त्यांचे क्लब नेमके कुणाच्या आश्रयाने सुरू आहेत, असा सवालही ॲड. गोरे यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांचा आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान, मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणाला पाठिंबा देत प्रशासनाने अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. कारवाई न झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांसह उपोषणात सहभागी होण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.
मनसेचे महानगरप्रमुख संजय सोनवणे यांनी पत्राद्वारे आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
एमडी ड्रग्सच्या विक्रीवरही कठोर कारवाईची मागणी
गेल्या दीड ते दोन महिन्यांत पोलिसांनी शहरातील काही ठिकाणी कारवाई करून एमडी ड्रग्स जप्त केल्याबद्दल ॲड. गोरे यांनी पोलिसांचे स्वागत केले. मात्र, महाविद्यालय परिसरातही नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप करत तरुण पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने हा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. एमडीसह अन्य नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या गुटख्याची तस्करी धुळे जिल्ह्यातून होत असल्याचा आरोप करत केवळ वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करता या तस्करीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अवैध धंद्यांची ठिकाणे जाहीर करण्याचा दावा
शहरातील अवैध धंद्यांची ठिकाणे जाहीर करण्याची घोषणा ॲड. पंकज गोरे यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी केली होती. त्यानुसार महात्मा गांधी पुतळ्याजवळील गोल पोलीस चौकी परिसर, प्रभाकर चित्रपटगृह परिसरातील नृसिंह मंदिराजवळ, विद्यावर्धिनी महाविद्यालय परिसर, शहर पोलीस ठाणे व बसस्थानक परिसर, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याजवळील परिसर, देवपुरातील सप्तशृंगी मंदिर परिसर तसेच विविध शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सट्टा क्लब, पत्त्यांचे क्लब, गांजा व अवैध दारूविक्री सुरू असल्याचे आरोप त्यांनी केले.
या ठिकाणी कारवाई होत नसल्याचा आरोप करत प्रशासनावर कारवाई न करण्यासाठी दबाव आणणाऱ्यांचाही आंदोलनातून निषेध करण्यात आला.
शनिवारी आमदार अनिल अण्णा गोटे आंदोलनस्थळी
या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ॲड. पंकज गोरे यांनी दिला आहे. दरम्यान, शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता आमदार अनिल अण्णा गोटे आंदोलनस्थळी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
धुळे जिल्हा अवैध धंदे व गुन्हेगारीमुक्त करून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी पंकज भारस्कर, दिलीप चित्ते, सूरज भावसार, संदीप चौधरी, कार्तिक पाटील, संजय पाटील, बंटी गोरे, आप्पा लहामगे, गोपी सोनार, विशाल ढेकळे, सोनू मूर्तडकर, गोकुळ येलमामे यांच्यासह विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
