विद्यार्थ्यांच्या हातातील राख्या जवानांच्या मनगटावर; योगमाया प्रतिष्ठानचा देशप्रेमाचा अनोखा उपक्रम
‘एक राखी देश के नाम’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; भुसावळ मिलिटरी स्टेशनमध्ये ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले सभागृह
अश्विन सुरवाडे मुक्ताईनगर प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योगमाया प्रतिष्ठान, मुक्ताईनगर यांच्या वतीने ‘एक राखी देश के नाम’ हा भावनिक आणि देशप्रेम जागविणारा उपक्रम राबविण्यात आला. १४ ते २४ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मुक्ताईनगर शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. त्यासोबतच जवानांसाठी शुभेच्छा पत्रके आणि कृतज्ञता व्यक्त करणारी हस्तलिखित पत्रेही तयार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या माध्यमातून जवानांपर्यंत पोहोचवत देशसेवेबद्दल आदर व्यक्त केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यात देशप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न झाला.
विविध शाळांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमात सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, स्व. निखिल भाऊ खडसे इंग्लिश मिडीयम स्कूल, श्री. एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय, संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासह ग्रामीण भागातील मंजाबाई महादू नारखेडे माध्यमिक विद्यालय (रुईखेडा), नवीन माध्यमिक विद्यालय (निमखेडी) आणि पूर्णामाई माध्यमिक विद्यालय (घोडसगाव) येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
भुसावळ मिलिटरी स्टेशनवर राख्यांचे प्रदर्शन
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या, शुभेच्छा पत्रके आणि हस्तलिखित पत्रांचे भुसावळ मिलिटरी स्टेशन (आरपीडी एरिया) येथे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या एनसीसी कॅम्पच्या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमात जवानांना प्रत्यक्ष राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला.
आपल्या कुटुंबीयांपासून आणि बहिणींपासून दूर राहून देशसेवा करणाऱ्या जवानांना विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या व पत्रे पाहून विशेष आनंद झाला. जवानांच्या मनगटावर विद्यार्थिनींनी बांधलेल्या राख्यांमुळे भावनिक वातावरण निर्माण झाले.
सैन्य अधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे कौतुक
यावेळी १८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर धीरज मिनोत्रा, एस.ओ. श्यामबाबू यांच्यासह सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगमाया प्रतिष्ठानच्या या अनोख्या देशप्रेमाच्या उपक्रमाचे उपस्थित अधिकारी व जवानांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी संपूर्ण सभागृह ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय हिंद’ आणि ‘हाऊस द जोश’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले. या घोषणांमुळे कार्यक्रमस्थळी देशप्रेमाचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगमाया प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांच्या माध्यमातून जवानांप्रती कृतज्ञता आणि देशसेवेचा सन्मान व्यक्त करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
