अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात बोदवडमध्ये १ सप्टेंबरला विराट एल्गार महामोर्चा
आरक्षणाचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्याची मागणी; समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बोदवड | जिल्हा प्रतिनिधी : सतीश बावस्कर
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात तसेच आरक्षणाचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी बोदवड येथे १ सप्टेंबर २०२६ रोजी विराट एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, ता. बोदवड यांच्या वतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड येथून तहसील कार्यालयाकडे रवाना होणार आहे. अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये, आरक्षणाचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवावा, तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणार
महामोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. आरक्षणाच्या हक्कासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“आरक्षण हा आपला घटनात्मक हक्क आहे. तो अबाधित ठेवण्यासाठी एकजुटीने लढा देऊया,” असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावर समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चाकडे बोदवड तालुक्यातील समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.
