राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करणार : विजय चोरडिया
संभाजीनगरमध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची जिल्हा बैठक; संघटनात्मक बांधणीसह कृतिशील कार्यक्रमांची आखणी
संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव
राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता अधिक तीव्र करण्यात येणार आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याची गरज असून, प्रश्न केवळ निवेदनांपुरते मर्यादित न ठेवता त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि कृतिशील कार्यक्रम राबविण्यात येतील. या लढ्यासाठी राज्यातील प्रत्येक पत्रकाराची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले.
संभाजीनगर येथे आयोजित ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या जिल्हा बैठकीत पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष कानिप अन्नपूर्णे आणि कार्याध्यक्ष किशोर महाजन यांनी विजय चोरडिया यांचे स्वागत केले.
पत्रकारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम तो करतो. मात्र हे काम करणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या समस्या अनेकदा दुर्लक्षित राहतात. पत्रकारांना सुरक्षित वातावरण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवासाची व्यवस्था, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, कौशल्यविकासाच्या संधी तसेच सेवानिवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळणे आवश्यक आहे. या प्रश्नांसाठी संघटनेने व्यापक आणि सातत्यपूर्ण लढा उभारला पाहिजे, असे चोरडिया यांनी स्पष्ट केले.
केवळ सरकारकडे मागण्या मांडणे पुरेसे नसून, त्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करून त्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने घेतली आहे. राज्यातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना संघटित ताकद देणे, प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि त्यानंतर स्थानिक पातळीवर पत्रकारांच्या प्रश्नांवर कृतिशील कार्यक्रम उभारणे, ही पुढील काळातील दिशा असेल, असेही त्यांनी सांगितले.
आठ दिवसांत कार्यकारिणी जाहीर होणार
दरम्यान, संभाजीनगर जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला वेग देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हा, शहर आणि तालुका पातळीवरील कार्यकारिणी येत्या आठ दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष कानिप अन्नपूर्णे यांनी दिली.
संघटनेची रचना पूर्ण झाल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर आधारित ठोस आणि कृतिशील कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. केवळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती न करता प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे अन्नपूर्णे यांनी सांगितले.
पत्रकारांच्या कल्याणासाठी पंचसूत्री
कार्याध्यक्ष किशोर महाजन यांनी संभाजीनगरमध्ये लवकरच अभूतपूर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पत्रकारांच्या स्थानिक समस्यांचा अभ्यास करून त्यावर पुढाकार घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांचे घर, आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्किलिंग आणि सेवानिवृत्तीनंतरचे जीवन या पंचसूत्रीवर ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ काम करत आहे. पत्रकारांच्या आयुष्याशी संबंधित या पाच महत्त्वाच्या प्रश्नांना संघटनेने आपल्या कार्याचा केंद्रबिंदू बनवले आहे. संभाजीनगरमधील पत्रकारांसाठीही या माध्यमातून ठोस उपक्रम राबविण्यात येतील, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.
पत्रकारांच्या प्रश्नांवर मैदानात उतरण्याचा निर्धार
बैठकीत उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनात्मक बांधणी, जिल्हा-शहर-तालुका कार्यकारिणीची घोषणा, स्थानिक प्रश्नांचे संकलन आणि आगामी कृतिशील कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
संभाजीनगरमध्ये संघटनेची मजबूत आणि सक्रिय यंत्रणा उभी करून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीच्या शेवटी संभाजीनगरसह राज्यभरातील पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटनेची ताकद अधिक वाढवून आक्रमक आणि कृतिशील भूमिका घेण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीस कानिप अन्नपूर्णे, पठाण मेहराज खान, सैयद नदीम सौदागर, बबनडाव सोनवणे, सुरेश शिरसागर, संजय हिंगोलीकर, शेख शकील, प्रवीण मुर्डे, हेमंत महाले, गणेश खरात, अनिस शेख, डॉ. शेख अफसर, रमेश बाबा, नरेश धाबर्डे, सैयद करीम मुनिर, अब्दुल कयूम, किशोर महाजन, यश राज, राजू खंडाळकर, सतीश जाधव, अरुण सुरवडकर, अब्दुल गन्नी शेख, शेख सईद आणि फिरोज पठाण यांच्यासह ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
