नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवानिमित्त मानमोडीत ५०० फोल्डर फाईलचे वाटप
महत्त्वाची कागदपत्रे जतन करण्यासाठी अभिनव उपक्रम; प्रत्येक घरापर्यंत फोल्डर पोहोचविण्याचा संकल्प
मानमोडी, ता. बोदवड | प्रतिनिधी :
लोकनेते मा. नाथाभाऊ यांच्या नाबाद ७५व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मानमोडी येथे सामाजिक बांधिलकी जपत एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित व व्यवस्थित जतन करता यावीत, या उद्देशाने कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्लास्टिक कोटेड चैन असलेल्या ५०० आकर्षक फोल्डर फाईलचे वितरण करण्यात येणार आहे.
दैनंदिन जीवनात विविध शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली जातात. त्यामुळे ऐनवेळी कागदपत्रांची शोधाशोध करावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी सर्व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवता यावीत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
अनेक महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्याची सुविधा
या फोल्डरमध्ये जन्म दाखला, शाळेचे दाखले, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, एटीएम कार्ड, बांधकाम कार्ड, आयुष्मान कार्ड, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, जात प्रमाणपत्र, वारस दाखले, घर, वाहन व शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, बँक पासबुक तसेच दुर्मिळ छायाचित्रे आदी कागदपत्रे सुरक्षितपणे ठेवता येणार आहेत.
विद्यार्थी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीतून उपक्रम
लोकनेते नाथाभाऊ यांनी प्रदीर्घ काळ जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला असून, शेतकरी व कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम केले आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी ७५व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मानमोडी येथे हा छोटासा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे तालुकाध्यक्ष आबा पाटील यांच्या पुढाकाराने तसेच समस्त गावकरी मंडळी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, लोकनेते नाथाभाऊ यांना उदंड, निरामय आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे, यासाठी मानमोडी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदेवता आई मरीआईच्या चरणी मंगलकामना करण्यात आल्या.
