बावीत अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त भव्य रक्तदान शिबिर
आध्यात्मिक सोहळ्याची सामाजिक बांधिलकीतून सांगता; महिला व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
अहिल्यानगर, प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार : जामखेड तालुक्यातील बावी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त समस्त ग्रामस्थ बावी आणि धर्मवीर शंभूराजे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला बावी गावासह पंचक्रोशीतील तरुण आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.
‘रक्तदान करा, जीवनदान द्या’, ‘तुमचे रक्त, कोणाच्यातरी जीवनाची आशा’ आणि ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या संदेशाने प्रेरित होऊन अनेक रक्तदाते स्वयंस्फूर्तीने पुढे आले. विशेषतः तरुणांसह महिलांनीही रक्तदानात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
अखंड हरिनाम सप्ताहासारख्या आध्यात्मिक उपक्रमाची सांगता रक्तदानासारख्या लोककल्याणकारी उपक्रमाने करून बावी ग्रामस्थ आणि धर्मवीर शंभूराजे ग्रुपने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. अध्यात्मासोबतच समाजसेवेची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
रक्तदान शिबिराला मिळालेला तरुणाई आणि महिलांचा प्रतिसाद पाहता ‘सेवेतून अध्यात्म आणि रक्तदानातून जीवनदान’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.
