ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत कु. भूमी मनोज पाटील राज्यातून प्रथम
‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे सत्कार; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविले यश
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
बालपणापासून चित्रकलेची आवड जोपासत वडिलांकडून मिळालेल्या कलेच्या वारशाला मेहनत, जिद्द आणि चिकाटीची जोड देणाऱ्या कु. भूमी मनोज पाटील हिने ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत तिचा सत्कार करण्यात आला.
भूमीने आपले माध्यमिक शिक्षण श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच तिने चित्रकलेतील आपली आवड आणि कलागुण जोपासले. लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या फिनिक्स अकॅडमीतही भूमीने शिक्षण घेतले. विद्यार्थीदशेपासूनच तिला कला क्षेत्रात प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत राहिले.
भूमीला चित्रकलेचा वारसा तिचे वडील पेंटर मनोज पाटील यांच्याकडून मिळाला. साईन बोर्ड पेंटर असलेल्या वडिलांची पेंटिंगची कला ती बालपणापासून जवळून पाहत होती. कार्टून आणि स्केच काढण्यापासून सुरू झालेला तिचा कलाप्रवास पुढे विविध चित्रकला स्पर्धांपर्यंत पोहोचला. तालुकास्तरीय तसेच इतर स्पर्धांमध्ये तिने अनेकदा प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कलेची छाप उमटवली.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही तिच्या वडिलांनी तिच्या कलेला कधीही अडथळा येऊ दिला नाही. आवश्यक चित्रकला साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. घरातील कामे सांभाळून भूमीने स्केचिंग, रंगकाम आणि चित्रकलेचा नियमित सराव सुरू ठेवला.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने फाईन आर्ट्स, मुंबई येथे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांच्या पाठिंब्याने तिने सीईटीची तयारी केली आणि चित्रकलेच्या अभ्यासक्रमासाठी तिची निवड झाली. त्यानंतर तिने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे एक वर्ष शिक्षण घेतले. मात्र दुसऱ्या वर्षी योग्य वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध न झाल्याने तिला हे शिक्षण अपूर्ण सोडावे लागले. या परिस्थितीमुळे ती निराश झाली असताना वडिलांनी तिला आधार देत “पेंटिंग कधीही बंद करू नकोस, तुझ्यात कला आहे,” असा आत्मविश्वास दिला.
वडिलांच्या प्रेरणेतून भूमीने स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयात ए.टी.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित शिक्षण आणि अथक सरावाच्या बळावर भूमीने अखेर आपल्या मेहनतीचे रूपांतर यशात केले.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवत तिने कुटुंबीय, शिक्षक, महाविद्यालय आणि पाचोरा परिसराचा गौरव वाढविला आहे. तिचे पुढील ध्येय जी.डी. आर्टचे शिक्षण पूर्ण करून चित्रकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आहे.
भूमीच्या या यशाचा गौरव करण्यासाठी लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत तिचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लिनेस क्लबच्या ज्येष्ठ संचालिका ॲड. प्रा. सौ. वैशालीताई बोरकर, ज्येष्ठ संचालिका सौ. रूपालीताई पाटील, सचिव सौ. सरलाताई पाटील, कोषाध्यक्ष सौ. प्रियाजी लाहोटी, PRO व सहसचिव कु. चेतना रणदीप हिरे यांच्या हस्ते भूमीचा गौरव करण्यात आला. यावेळी कु. नेहा ज्ञानेश्वर पाटील आणि कु. साक्षी दादाराव शेळके उपस्थित होत्या.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कलेच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या भूमीची यशोगाथा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.