ग. स. बँक निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग; लोकमान्य पॅनलच्या विजयाची दाट शक्यता
पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी होणार, १६ जागांसाठी निवडणूक
धुळे : प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची बँक असलेल्या ग. स. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. शहरातील महाराणा प्रताप हायस्कूल येथे सकाळी ८ वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दरम्यान, विरोधकांकडून अल्प उमेदवारी राहिल्याने ही निवडणूक एकतर्फी ठरण्याची शक्यता व्यक्त होत असून, लोकमान्य पॅनलच्या विजयाची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ग. स. बँकेच्या संचालक मंडळातील एकूण १६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील १३, महिला प्रवर्गातील २ आणि जळगाव सर्वसाधारण प्रवर्गातील १ जागेचा समावेश आहे. लोकमान्य पॅनलच्या विरोधात केवळ तीन उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे.
६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या निवडणुकीत सुमारे ६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

लोकमान्य पॅनलच्या पदाधिकाऱ्यांचा दांडगा जनसंपर्क, निवडणूक प्रचारातील सक्रियता, मतदारांशी सातत्याने साधलेला संपर्क आणि बँकेच्या कारभारातील स्वच्छ प्रतिमा या बाबी पॅनलच्या बाजूने जात असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच विरोधी गटाकडून तुलनेने कमी उमेदवार मैदानात असल्याने लोकमान्य पॅनलचे पारडे जड असल्याचे चित्र मतदानाच्या दिवशी दिसून आले.
उद्या मतमोजणी; निकालाकडे लक्ष
आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे. त्यामुळे लोकमान्य पॅनलला मतदारांचा नेमका कौल किती मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र असले तरी अंतिम निकाल मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
यावेळी लोकमान्य पॅनलचे गटनेते निशांत रंधे, पॅनल प्रमुख संजय शिंदे, चंद्रकांत सत्तेसा, संजय पवार, गणेश सत्तेसा, योगेश धात्रक, दीपक अहिरे, दीपक निकम, संजय पारधी, सोनाली भांबरे, कविता मोरे आदी उपस्थित होते.
