बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा धडाका!
चोरी, दरोडे, हल्ल्यांच्या घटनांनी ग्रामीण भागात भीती; ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ म्हणत तरुणांचा रात्रीचा पहारा
मलकापूर : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरी, दरोडे, हल्ले आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही गुन्हेगारीच्या घटना समोर येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा तसेच शेतातील उंच पिकांचा फायदा घेत चोरटे पसार होत असल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
नांदुरा तालुक्यातील काटी येथे दरोड्यादरम्यान एका व्यक्तीचा खून झाल्याच्या घटनेने परिसर हादरला. माखनेर येथे महिलेवर हल्ल्याची घटना घडली, तर खुमगाव-बुट्टी परिसरात ग्रामस्थांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली. मलकापूर परिसरातही संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये अधिक सतर्कता निर्माण झाली आहे.
धारदार शस्त्राचा धाक; मलकापूर तालुक्यात खळबळ
मलकापूर तालुक्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या एका महिलेवर दोन इसमांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना यापूर्वी समोर आली होती. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
अफवांमुळे संभ्रम; संशयाच्या आधारावर मारहाणीचे प्रकार चिंताजनक
गुन्हेगारीच्या घटनांबरोबरच चोरट्यांबाबतच्या अफवा वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी संशयाच्या आधारावर फेरीवाल्यांना मारहाण करण्याचे प्रकारही घडल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
संशयित व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
ग्रामीण भागातील वाढती असुरक्षितता लक्षात घेता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संवेदनशील गावांमध्ये नियमित पेट्रोलिंग करावे आणि गावोगावी जनजागृती शिबिरे घेऊन नागरिकांना सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
‘आपलं गाव, आपली जबाबदारी!’; तरुणांचा रात्री पहारा
गुन्हेगारीच्या घटनांनंतर अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून तरुण व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी काठ्या, टॉर्च घेऊन गावात गस्त घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नांदुरा तालुक्यातील हिंगणे गव्हाळ, चांदूर बिस्वा, विटाळी धानोरा, मामुलवाडी, वडनेर, काटी तसेच मलकापूर तालुक्यातील घिर्णी, बेलाड, उमाळी, माखनेर, बाहापुरा, पान्हेरा आदी गावांमध्ये रात्रीच्या वेळी ग्रामस्थांकडून पहारा दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनासमोर दुहेरी आव्हान
एकीकडे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, तर दुसरीकडे गावाच्या सुरक्षेसाठी तरुणांची एकजूट, असे दुहेरी चित्र बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरपणे हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांची प्रभावी गस्त, तातडीची कारवाई आणि ग्रामस्थांचे सहकार्य यांच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. अफवा आणि संशयातून कायदा हातात घेण्याचे प्रकार रोखतानाच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
