वाघोड जिल्हा परिषद शाळेत ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ अभियान उत्साहात!
ग्रामस्थांसह शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व कर्मचाऱ्यांचे श्रमदान; स्वच्छतेमुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला
रावेर : विशेष प्रतिनिधी (प्रदीप खैरे)
शासनाच्या निर्देशानुसार रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वाघोड येथे ‘एक दिवस शाळा स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शाळेची इमारत, वर्गखोल्या तसेच संपूर्ण शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता अभियानाला प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभाताई बडगुजर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चौधरी, पत्रकार श्री. दिलीप महाजन, कुंवारस्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रमोद चौधरी व संस्थेचे सदस्य तसेच डॉ. श्री. दीपक सोलंकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामस्थांचे श्रमदान; शाळा परिसर चकाचक
अभियानात शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. निलेश महाजन आणि स्वच्छता कर्मचारी श्री. युवराज सरपटे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
गावातील विविध घटकांनी एकत्र येत स्वच्छता मोहिमेत श्रमदान केल्याने अभियानाला सामाजिक एकजुटीचे आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. शाळेच्या परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि परिसर सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात आला.
‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळे’मुळे सकारात्मक वातावरण
स्वच्छता अभियानामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला असून विद्यार्थ्यांसाठी अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराचे परिसरात कौतुक होत आहे.
शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार रुजविणारे महत्त्वाचे केंद्र आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
