NSS माजी विद्यार्थी गेट-टुगेदर २०२६ उत्साहात संपन्न
पाचगणी-महाबळेश्वर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; स्वच्छता मोहिमेत १५० किलोपेक्षा अधिक कचरा संकलित
धरणगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या NSS माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व गेट-टुगेदर २०२६ चे दुसरे वर्ष पाचगणी-महाबळेश्वर येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाले. या कार्यक्रमाला NSS चे १५ स्वयंसेवक आणि १० महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी योगगुरू डॉ. भालचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली योगसत्राने झाली. त्यानंतर पाचगणी नगरपरिषद आणि Nestlé प्रणित ‘हिलदरी’ अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मुकेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध सिडनी पॉईंट परिसरात श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १५० किलोपेक्षा अधिक कचरा संकलित केला. या माध्यमातून ‘स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी’ असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत वाढवली
दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम, स्वयंसेवकांचा सत्कार आणि उपस्थितांचे मनोगत यांचे आयोजन करण्यात आले. विविध कलाविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते शेरो-शायरी सादर करणारे ‘बेताब बादशहा’ दिलशाद शेख आणि मनमोहक अदाकारीने उपस्थितांची मने जिंकणारी नृत्यांगना ‘धकधक गर्ल’ कांचन पडळकर (ऐश्वर्या). कांचन पडळकर यांनी शिबिरात उत्कृष्ट व कलात्मक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
याशिवाय छोटा स्वयंसेवक आर्तुरुल गाझी हा देखील कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला.
नियोजन समितीचे योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष नियोजन समिती गठित करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षपदी सय्यद मुश्ताक, उपाध्यक्षपदी सुबोधकुमार पाटील, खजिनदारपदी विनायक महाजन, सल्लागार म्हणून डॉ. मुकेश कुलकर्णी, तर महिला अध्यक्षा म्हणून मनिषा मानकर यांनी जबाबदारी सांभाळली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेत स्नेहमेळावा यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या शेवटी विनायक महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. माजी विद्यार्थी, स्वयंसेवक आणि महिला स्वयंसेविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गेट-टुगेदर २०२६ च्या दुसऱ्या पर्वाला विशेष रंगत प्राप्त झाली.
