पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आक्रमक
अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांची भेट; निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन
कल्याण प्रतिनिधी प्रशांत ल. ढोणे : डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारासोबत पोलिसांकडून कथित गैरवर्तन, शिवीगाळ आणि खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात सोमवारी दुपारी ४ वाजता व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पत्रकारांशी कथित गैरवर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तपास अधिकाऱ्यांकडून कथित अरेरावीचा आरोप
कामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर असल्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि तपासातील महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळावी, या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य तथा ‘राष्ट्रभूमी भरारी’चे संपादक गौतम गवई हे रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते.
तपासाबाबत माहिती घेण्यासाठी आणि काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधित तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांनी कथितरित्या अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली तसेच पत्रकाराविरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे.
या आरोपांमुळे पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवादाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी पत्रकार संघटनेकडून करण्यात आली आहे.
“पत्रकारांशी गैरवर्तन गंभीर बाब”
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, गंभीर प्रकरणांची माहिती घेण्यासाठी पत्रकारांकडून प्रश्न विचारले जाणे ही त्यांच्या कामाचा भाग आहे. अशा वेळी पत्रकारांशी गैरवर्तन किंवा धमकीचे प्रकार घडणे ही गंभीर बाब असल्याचे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
चौकशी करून योग्य कारवाईचे आश्वासन
व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
आता या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रिमो गौतम वाघ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुरेश जगताप, जगन्नाथ जावळे, संतोष क्षेत्रे, रजनीकांत गायकवाड, ताराचंद तायडे, प्रशांत लक्ष्मण ढोणे, राजू दोंदे, देवानंद पाढेन, राजदीप जगताप यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
या प्रकरणी संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा देत उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
