सर्वज्ञ महादेव मंदिर परिसर म्हणजे श्रद्धा, सात्त्विकता अन् प्रसन्नतेचा सुंदर संगम — पालकमंत्री गुलाबराव पाटील
चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हनुमान मंदिराची स्थापना; पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ‘संत कुटिया’चे अनावरण आणि महाआरती
जळगाव प्रतिनिधी, दि. १ : शहरातील गट क्रमांक ५४, शिव कॉलनी येथील सर्वज्ञ महादेव मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हनुमान मंदिराची स्थापना तसेच ‘संत कुटिया’च्या अनावरणाचा सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, प. पू. पद्मनाभन महाराज, रामेश्वर महाराज आणि प. पू. भक्तीप्रियदासजी स्वामी यांच्या हस्ते ‘संत कुटिया’चे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. साधू-संत आणि भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

सर्वज्ञ महादेव मंदिर परिसरात प्रवेश करताच मनाला वेगळीच प्रसन्नता आणि शांतता लाभते. अध्यात्म, सात्त्विकता, स्वच्छता आणि सुंदरता यांचा सुरेख संगम येथे साधला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंदिर परिसराचे कौतुक केले. त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून तेथील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाबद्दल समाधान व्यक्त केले.
“मंदिरे ही केवळ श्रद्धेची स्थाने नसून समाजाला संस्कार, सद्विचार आणि माणुसकीची प्रेरणा देणारी ऊर्जाकेंद्रे आहेत. अशा धार्मिक स्थळांमुळे समाजात श्रद्धा, एकोपा आणि सद्भावनेची भावना अधिक दृढ होते,” असे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित साधू-संतांचे स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
सर्वज्ञ महादेव मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात हनुमान मंदिराची विधिवत स्थापना करण्यात आली. विविध धार्मिक विधी, साधू-संतांचे सान्निध्य आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास माजी नगरसेवक विशाल भोळे, ट्रस्टचे मार्गदर्शक रत्नाकर आप्पा झांबरे, अध्यक्ष मयूर गुर्जर, उपाध्यक्ष शेखर सोनार, सचिव प्रीतम गुजर यांच्यासह शिवपुरी गोसावी, किशोर चौधरी, सुनील जोशी, भगवान पाटील, अभय कुलकर्णी, हरिप्रसाद कुशवाह, शामराव वालडे, महेश महाजन, के. एम. बापू, कमलाकर पाटील, अनिल पाटील, सुधीर सोनार, प्रवीण कोलते, दिनेश शिंपी, जितेंद्र झांबरे, किरण गोसावी, केदारनाथ ठाकूर, रमेश कुशवाह, शरद बोरसे, भगवान वालडे, पंकज कुशवाह, सुनील पाटील, दीपक गुलाब बोरसे, प्रदीप महाले, अनिरुद्ध कुशवाह, दुर्गेश साळुंखे, बंटी बोरसे, राहुल पाटील, प्रणय झांबरे, पियुष कुशवाह आणि कैलास चौधरी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उपस्थितांनी विविध स्वरूपात सेवा दिली.
‘हर हर महादेव’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. साधू-संतांचे सान्निध्य, भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भक्तीचा जागर यामुळे सर्वज्ञ महादेव मंदिराचा चौथा वर्धापन दिन श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्माचा मंगलमय सोहळा ठरला.
