फेकरीत पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावल, रावेर, भुसावळ तालुक्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
भुसावळ प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत फ्रेंड्स क्लबच्या वतीने पॉवर लिफ्टिंग खुली बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावल, रावेर आणि भुसावळ तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. खेळाडूंनी आपल्या ताकदीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकारण निकम यांनी केले. यावेळी फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष निशांत निकम, उल्हास बोरोले, प्रकाश सरदार, सिद्धार्थ निकम, महेंद्र चव्हाण, रमेश निकम, अन्वर शेख, योगेश सोनवणे, सिद्धार्थ मेढे, किरण हातोले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी विजेत्यांसह सर्व सहभागी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फेकरी येथील फ्रेंड्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेतले. स्थानिक क्रीडाप्रेमींनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महेंद्र चव्हाण सर यांनी सर्व सहभागी खेळाडू, मान्यवर पाहुणे आणि उपस्थितांचे आभार मानले. या स्पर्धेमुळे फेकरी परिसरासह यावल, रावेर आणि भुसावळ तालुक्यात पॉवर लिफ्टिंग या क्रीडाप्रकाराला अधिक चालना मिळण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
