महेश अर्बन क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न
आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीचा वसा; सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा
मलकापूर प्रतिनिधी : महेश अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, मलकापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा रोडवरील संपूर्ण लॉन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष मख्खनलाल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संचालक मंडळासह सभासद, ठेवीदार आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी दिवंगत सभासद तसेच राष्ट्रसेवा आणि सामाजिक क्षेत्रात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवान व पोलिस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष किशोरजी बाहेती यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा आर्थिक अहवाल व पत्रक सभासदांसमोर सादर केला. सभासदांनी त्यास मंजुरी दिली.
आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला
महेश अर्बन क्रेडिट सोसायटीने गेल्या ३७ वर्षांत आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकीची परंपराही जपली आहे. संस्थेकडे सुमारे ४९.५३ कोटी रुपयांच्या ठेवी, ३७.७९ कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि १८.७४ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेचे भागभांडवल सुमारे १.७३ कोटी रुपये असून आतापर्यंत ८.९० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असल्याची माहिती सभेत देण्यात आली.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात संस्थेला ३७.३४ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम
संस्थेचे अध्यक्ष मख्खनलाल मुंदडा यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीवर प्रकाश टाकत विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या सभासदांसाठी १ लाख रुपयांची जनता विमा पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. तसेच सभासदांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत, मेडिकल कॅम्प, गोसेवा आदी सामाजिक उपक्रमांनाही संस्थेकडून सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेदरम्यान काकासाहेब दीक्षित प्रशिक्षण केंद्र, अकोला येथील पी. यू. गोपनारायण यांनी सभासदांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यानंतर झालेल्या खुल्या चर्चेत सभासद व पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
यावेळी मलकापूर नगरपरिषदेत निवडून आलेले किसनराव पाटील, दुर्गेश राजापूर आणि मिनाक्षी पाचपांडे यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेच्या समारोपप्रसंगी व्यवस्थापक सुनील अग्रवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ठेवीदार आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर सभेची सांगता झाली.
