भडगाव तहसील कार्यालयासमोरील प्रहार दिव्यांग संघटनेचे उपोषण लेखी आश्वासनाने मागे
पाच-सहा महिन्यांपासून मानधन थकीत; अंत्योदय योजनेत दिव्यांगांना समाविष्ट करण्याची मागणी
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ : दिव्यांग बांधवांचे पाच ते सहा महिन्यांपासून थकीत असलेले संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तातडीने अदा करावे, तसेच पात्र दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड योजनेत समाविष्ट करावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने भडगाव तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी मागे घेण्यात आले.
दि. १ रोजी सकाळी ११ वाजता या उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपोषणस्थळी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. संघटनेने यापूर्वीच तहसीलदार शीतल सोलाट यांना उपोषणाचा इशारा देणारे निवेदन दिले होते.
मानधनासाठी दिव्यांगांच्या तहसील कार्यालयात चकरा
तालुक्यातील पात्र दिव्यांग बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेकांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून संजय गांधी योजनेचे मानधन मिळालेले नाही. मानधनासाठी दिव्यांग बांधवांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असून, त्यांना ‘पोर्टल बंद आहे’ असे उत्तर दिले जात असल्याचा आरोप संघटनेने केला.
पोर्टल सुरू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर अद्याप ठोस पाठपुरावा झालेला नसल्याचेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे थकीत मानधन तातडीने मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
अंत्योदय योजनेत समावेशाची मागणी
दिव्यांग बांधवांनी अंत्योदय रेशन कार्डासाठी पुरवठा शाखेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही तालुक्यातील तसेच शहरातील अनेक पात्र दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार पात्र दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दिव्यांगांच्या विविध योजनांच्या बाबतीत तहसील कार्यालयाची उदासीनता दिसून येत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.
अधिकाऱ्यांची उपोषणस्थळी भेट
उपोषणस्थळी संजय गांधी योजना तहसीलदार रमेश देवकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी संजय गांधी योजना विभागाचे अधिकारी एस. डी. सोनवणे हेही उपस्थित होते. संघटनेच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर दि. १ रोजी दुपारी उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणस्थळी नागरिकांनी भेट देऊन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
सन्मानजनक वागणुकीचीही मागणी
दिव्यांगांच्या योजनांबाबत चौकशीसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग बांधवांना तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानजनक वागणूक मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी भूमिका संघटनेने घेतली.
उपोषणाच्या निवेदनावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, भडगावचे तालुकाध्यक्ष करतारसिंग रामसिंग परदेशी यांची स्वाक्षरी आहे.
पदाधिकारी व दिव्यांग बांधवांची उपस्थिती
उपोषणावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंहले, जिल्हा सचिव धर्मराज पाटील, ज्येष्ठ सल्लागार राजू परदेशी, तालुकाध्यक्ष करतारसिंग रामसिंग परदेशी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रत्नाबाई निकम, तालुका सल्लागार भरत धोबी, तालुका उपाध्यक्ष भारत पाटील, शहराध्यक्ष संजय कोळी, कार्याध्यक्ष गजानन तांबटकर, तालुका संपर्कप्रमुख निलेश पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष रवी पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष अविनाश मराठे यांच्यासह आनंदा पाटील, राजेंद्र पाटील, चंदू महाजन, भावडू सावंत, भगवान पाटील तसेच दिव्यांग बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
