गणेशोत्सवातील डीजेवरील बंदी उठवा; अन्यथा उपासमारीची वेळ येईल!
धुळे जिल्हा साउंड व डीजे चालक-मालक संघटनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन; नियमांचे पालन करण्याची ग्वाही
टिकर : डीजे व्यवसायावर बंदीमुळे चालक-मालक आर्थिक संकटात; पोलीस अधीक्षकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा संघटनेचा दावा
धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डीजे व ध्वनिवर्धकांवर घालण्यात आलेली बंदी तात्काळ उठवावी, अन्यथा या व्यवसायावर अवलंबून असलेल्या चालक, मालक आणि कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी आर्त मागणी धुळे जिल्हा साउंड व डीजे चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षकांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सण असून, या काळात विविध मंडळांकडून सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये साउंड आणि डीजे व्यवसायाला मोठी मागणी असते. मात्र, यंदा धुळे जिल्ह्यात डीजेवर बंदी घालण्यात आल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या चालक-मालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदीचा फेरविचार करून शासनाने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींच्या अधीन राहून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात रोजगाराच्या मर्यादित संधी असल्याने अनेक तरुणांनी साउंड आणि डीजे व्यवसायाचा आधार घेतला आहे. काही व्यावसायिकांनी बँकांकडून कर्ज घेऊन डीजेची उपकरणे खरेदी करून व्यवसाय सुरू केला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विवाह समारंभ तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांमधून मिळणाऱ्या कामावर त्यांचा आर्थिक उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळातच व्यवसायावर निर्बंध आल्यास कर्जाचे हप्ते, उपकरणांचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होणार असल्याचे चालक-मालकांचे म्हणणे आहे.
एका डीजेच्या व्यवसायावर चालक, ऑपरेटर, तंत्रज्ञ तसेच अन्य स्वरूपात चार ते पाच कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे डीजेवरील बंदीचा परिणाम केवळ मालकांपुरता मर्यादित न राहता संबंधित कामगार आणि त्यांच्या कुटुंबांवरही होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, ध्वनिप्रदूषणाबाबत शासन व न्यायालयांनी घालून दिलेल्या नियमांचा आदर केला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही डीजे चालक-मालकांनी पोलीस प्रशासनाला दिली. निर्धारित वेळेचे पालन, ध्वनीची मर्यादा आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या अन्य नियमांचे काटेकोर पालन करण्याची तयारी संघटनेने दर्शविली आहे. त्यामुळे पूर्ण बंदीऐवजी नियमांच्या चौकटीत व्यवसाय करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी डीजे चालक संघटनेचे अध्यक्ष विकी चौधरी, ऋषिकेश गव्हाणे, ललित वाघ, दीपक अहिरे, विवेक सूर्यवंशी, संकेत कुलकर्णी, सौरभ गाडीले, राज पाटील, प्रवीण धनगर, पंकज बागुल, किरण वराडे, संग्राम पाटोळे, सचिन शेवतकर, कुंदन पाटील, जिग्नेश गोसावी, शेखर दळे यांच्यासह जिल्ह्यातील डीजे चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने संघटनेच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
