मलकापूर रेल्वे स्थानकाच्या डाउन साईडला तिकीट घर, वेटिंग रूमसह FOBची मागणी
पंतनगरसह परिसरातील हजारो प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी; RPIकडून DRM, भुसावळ यांना निवेदन
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर रेल्वे स्थानकाच्या डाउन साईडला स्वतंत्र तिकीट घर, प्रवाशांसाठी वेटिंग रूम तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पादचारी पूल (FOB) उभारण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)च्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष भिवा भाऊ चोपडे यांच्या नेतृत्वाखाली दि. २ सप्टेंबर रोजी विभागीय रेल्वे प्रबंधक (DRM), भुसावळ विभाग यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात मलकापूर रेल्वे स्थानक हे शहरासह परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. डाउन साईडला मुक्ताईनगर, कुह्रा, काकोळा तसेच पंतनगर, एकतानगर, रेल्वे क्वार्टर्स व फातिमानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढताना या नागरिकांना अप साईडला जावे लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे RPIने निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय
डाउन साईडला स्वतंत्र तिकीट खिडकी व वेटिंग रूम नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. डाउन साईडला स्वतंत्र तिकीट घर आणि वेटिंग रूमची सुविधा उपलब्ध झाल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होण्यासोबतच मुख्य रेल्वे स्थानकावरील गर्दीही कमी होण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका टाळण्यासाठी FOBची मागणी
डाउन साईड परिसरातील नागरिकांना बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व शासकीय कार्यालयांकडे ये-जा करताना रेल्वे मार्गामुळे अडचणी निर्माण होतात. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पादचारी पूल (Foot Over Bridge) उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे RPIने म्हटले आहे.
FOB उभारल्यास पंतनगर, एकतानगर, रेल्वे क्वार्टर्स, फातिमानगर तसेच डाउन साईड परिसरातील हजारो नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल. तसेच रेल्वे रुळ ओलांडण्याचा संभाव्य धोका टाळता येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मूलभूत सुविधांचीही मागणी
RPIच्या वतीने डाउन साईडला स्वतंत्र तिकीट घर व वेटिंग रूम सुरू करणे, FOBला मंजुरी देऊन त्याचे तातडीने बांधकाम करणे, परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था तसेच स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच रेल्वे प्रशासनाने डाउन साईड परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव तयार करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष भिवा भाऊ चोपडे, शहराध्यक्ष अशोक भालशंकर, तालुका उपाध्यक्ष मुख्तार खान, तालुका सचिव कादर शेख करीम शेख, रफीक साहेब, अंकित दादा चोपडे, असित भैय्या इंगळे, जुबेर खान यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.
