वरखेडी तांडा शिवारात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; शेतकरी गंभीर जखमी
रात्री शेतात झोपलेल्या शेतकऱ्यावर अचानक हल्ला; आरडाओरड होताच बिबट्या पसार, परिसरात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी | सोयगाव
सोयगाव : वरखेडी तांडा (ता. सोयगाव) शिवारात शेत राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर सोमवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्रथम पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वरखेडी तांडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर वामन लहाने (वय ४४) यांची गट क्रमांक ६७ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतात कापूस व केळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. शेतातच बखार बांधून जनावरे बांधण्यात येतात तसेच रात्री शेतराखणीसाठी ते तेथेच झोपत असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे लहाने हे शेतराखणीसाठी शेतात गेले होते. रात्री सुमारे ११ वाजता ते झोपलेले असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारील शेतकरी मदतीसाठी धावून आले. नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर वरखेडी तांडा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे तसेच शेतराखणी करणे धोकादायक बनले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
