नोटरी अनिवार्य नसल्याचे तहसीलदारांचे स्पष्ट; नागरिकांमधील गैरसमज दूर
भाजप कार्यकर्त्यांच्या निवेदनानंतर तहसीलदार उल्हास देवरे यांचे स्पष्टीकरण; अनावश्यक नोटरी खर्चापासून नागरिकांना दिलासा
पारोळा प्रतिनिधी (संदीप पाटील) : विविध शासकीय कामांसाठी नोटरी करणे अनिवार्य करण्यात आल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. नोटरी अनिवार्य करण्याबाबत कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत, असे स्पष्ट स्पष्टीकरण पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे यांनी दिले.
याबाबत नागरिकांमध्ये सुरू असलेला संभ्रम दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ज्या शासकीय कामांसाठी नोटरीची आवश्यकता नाही, अशा कामांसाठी नागरिकांना अनावश्यकपणे नोटरी करण्यास भाग पाडू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नोटरीच्या खर्चाचा नागरिकांवर अनावश्यक भार
नोटरी करण्यासाठी लागणारा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याने, ज्या कागदपत्रांसाठी नोटरीची आवश्यकता नाही त्यासाठी नोटरी बंधनकारक केल्यास नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार पडू शकतो, अशी बाब भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिली.
तहसीलदारांचे स्पष्ट स्पष्टीकरण
यावेळी तहसीलदार उल्हास देवरे यांनी सांगितले की, नोटरी अनिवार्य करण्याबाबत शासन किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत गैरसमज करून घेऊ नये. शासकीय कामकाज आवश्यक कागदपत्रे आणि प्रचलित पेपरवर्कच्या आधारे पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
तसेच स्वयंघोषणापत्रासारख्या कागदपत्रांच्या बाबतीत आवश्यकतेनुसार रु. २०/- चे तिकीट किंवा रु. १००/- स्टॅम्प पेपरवर कागदपत्र करता येत असल्याचेही तहसीलदारांनी स्पष्ट केले. अशा बाबतीत अनावश्यकपणे नोटरी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
तहसीलदारांच्या या स्पष्टीकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, अनावश्यक नोटरीचा खर्च करण्याची गरज नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संबंधित शासकीय कार्यालयाकडून अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा तसेच शासकीय कामकाज अधिक सुलभ व्हावे, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
यावेळी भाजप न.पा. उपनगराध्यक्ष रोहन मोरे, नगरसेवक अमोल शिरोळे, भाजपा पारोळा तालुकाध्यक्ष अतुलअण्णा पवार, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, जिल्हा चिटणीस रवींद्र पाटील, सरचिटणीस विनोद पाटील, राजेंद्र चौधरी यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
