अन्यायकारक जीआर रद्द करा, आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा द्या! धुळ्यात आदिवासी समाजाचा ‘उलगुलान मोर्चा’
हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
धुळे प्रतिनिधी : अन्यायकारक जीआर रद्द करण्यासह आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धुळ्यात आदिवासी समाजाने आज ‘उलगुलान मोर्चा’ काढत शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे फलक हातात घेत आणि घोषणाबाजी करत आदिवासी समाजाने आपला संताप व्यक्त केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी समाज रस्त्यावर
पुणे आणि नाशिक येथे आदिवासी विद्यार्थ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यातही काही आदिवासी तरुणांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान काही तरुणांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाचा मुद्दा अधिक तीव्र झाला.
या आंदोलनाला आदिवासी समाजासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. अखेर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला.
विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका
अन्यायकारक जीआर रद्द करावा, आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सुरक्षितता आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी केली.
प्रकाश टाकी चौकातून मोर्चाला सुरुवात
धुळ्यातील प्रकाश टाकी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा पारोळा रोडमार्गे जुने मनपा, झाशी राणी पुतळा, नवीन मनपा मार्गे जेल रोड येथे पोहोचला. याठिकाणी मोर्चाचा समारोप करण्यात आला.
मोर्चादरम्यान आदिवासी समाजातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या एकजुटीचे प्रदर्शन
या मोर्चातून आदिवासी समाजातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांची एकजूट पाहायला मिळाली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मोर्चात आदिवासी क्रांती सेनेचे भरत जाधव, दिनेश पिंपळसे, संजय मोरे, अनिल सोनवणे, लक्ष्मण पवार, सुनील ठाकरे यांच्यासह आदिवासी समाजाचे शेकडो बांधव सहभागी झाले होते.
