विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात; ट्रकची समोरासमोर धडक
म्हसदीजवळ बंगाली बाबा मंदिर परिसरातील घटना; १७ विद्यार्थिनी जखमी, साक्री येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल
धुळे : प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बसला भीषण अपघात झाला. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील १७ विद्यार्थिनी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थिनींना उपचारासाठी साक्री येथील रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय विद्यार्थिनींना म्हसदी गावात घेऊन येणारी मानव विकास मिशनची बस क्रमांक MH 06 S 8589 आणि ट्रक क्रमांक MH 18 AA 5888 यांच्यात म्हसदी गावाजवळील बंगाली बाबा मंदिर परिसरात समोरासमोर धडक झाली.
या अपघातात उभंड, नांद्रे तसेच परिसरातील विविध गावांतील विद्यार्थिनींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले.

नागरिकांकडून तातडीने मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच म्हसदी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थिनींना बसमधून बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताचे कारण तपासाअंती स्पष्ट होणार
दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. जखमी विद्यार्थिनींची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
