बोदवड जि. प. उर्दू मुलींच्या शाळेत पहिली सर्वसाधारण सभा संपन्न
शिक्षणप्रेमी कलीम शेख यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वीकृत सदस्यपदी एकमताने निवड
बोदवड : येथील जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची पहिली सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत शाळेच्या सर्वांगीण विकासासह विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हितासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर आवश्यक त्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.
सभेतील प्रमुख निर्णय म्हणजे परिसरातील परिचित शिक्षणप्रेमी कलीम शेख यांची शाळा व्यवस्थापन समितीवर ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून एकमताने निवड करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्राविषयी असलेली त्यांची आस्था तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाला सभेतील उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी एकमताने पसंती दिली.
शाळेच्या विकासावर सकारात्मक चर्चा
पहिल्या सर्वसाधारण सभेत शाळेच्या भौतिक सुविधा अधिक सक्षम करणे, विद्यार्थिनींना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.
शाळेच्या विकासासाठी पालक, शिक्षक, समिती सदस्य आणि समाजातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी एकत्रितपणे योगदान देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कलीम शेख यांचे अभिनंदन
शाळा व्यवस्थापन समितीच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कलीम शेख यांचे शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उपस्थित सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक जफर शेख तसेच जननायक फाउंडेशनचे मोहसीन सर यांनीही कलीम शेख यांना शुभेच्छा दिल्या.
कलीम शेख यांच्या अनुभवाचा आणि शिक्षण क्षेत्राविषयीच्या आस्थेचा शाळेच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस यावेळी मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
