पी. डी. पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
शिक्षक दिनानिमित्त जळगाव काँग्रेस भवनात २५ गुरुजनांचा सन्मान; सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव : शहरातील सुवर्णमहोत्सवी महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव येथील काँग्रेस भवनात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील एकूण २५ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे शिक्षक पी. डी. पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अशोक भालेराव होते.
प्रमुख अतिथी म्हणून भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाचे योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, काँग्रेसचे सरचिटणीस मुक्ती हरुण, ओबीसी प्रदेशाध्यक्ष अशोक खलाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय महाजन, विजय कोसोदे, माजी शहराध्यक्ष शामभाऊ तायडे, विजय वाणी, श्रीधर चौधरी, डॉ. एस. एस. राणे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, काँग्रेसचे माजी सचिव ॲड. सलीम पटेल तसेच एस.सी. सेल अध्यक्ष अंकुश कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारांची यशस्वी वाटचाल
पी. डी. पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची यापूर्वीही विविध संस्थांनी दखल घेतली आहे. त्यांना सामाजिक-शैक्षणिक संघटनांकडून राज्यस्तरीय तीन, खान्देशस्तरीय दोन, जिल्हास्तरीय चार आणि तालुकास्तरीय पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच तहसील कार्यालय, धरणगाव यांच्याकडून त्यांना पाच वेळा उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पी. डी. पाटील यांनी, “पुरस्काराने ऊर्जा मिळते आणि काम करण्याची जबाबदारी वाढते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हेच माझे कर्तव्य आहे,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा देशमुख यांनी केले, तर आभार सरचिटणीस प्रदीप सोनवणे यांनी मानले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा झालेला हा सन्मान त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.
