अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जळगावात ४ ऑक्टोबरला भव्य ‘महामोर्चा’
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात महामोर्चा; पूर्वतयारीसाठी ६ सप्टेंबरला पद्मालय विश्रामगृहात जिल्हास्तरीय नियोजन बैठक
जळगाव : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाविरोधात राज्यभरात असंतोष व्यक्त होत असताना, या निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्ह्यात ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य ‘महामोर्चा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा महामोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी लोकसंघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
या महामोर्चाला प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री बबनराव घोलप, विद्यमान खासदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे तसेच ॲड. अमन आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ६ सप्टेंबरला बैठक
४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची व्यापक रूपरेषा, नियोजन आणि जनसंपर्क अभियान निश्चित करण्यासाठी रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे जिल्हास्तरीय विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत महामोर्चाच्या आयोजनाबाबत विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
‘घटनात्मक हक्क कमकुवत करण्याचा प्रयत्न’ असा आरोप
अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून समाजातील ऐक्याला बाधा आणण्याचा आणि घटनात्मक हक्क कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. या भूमिकेच्या निषेधार्थ ४ ऑक्टोबरच्या महामोर्चात जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून समाजबांधव, चळवळीतील कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीने म्हटले आहे.
सर्व घटकांना नियोजन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन
महामोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधवांनी ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नियोजन बैठकीस वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजक :
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी लोकसंघर्ष कृती समिती, जिल्हा जळगाव
