नाहाटा महाविद्यालयात ललित कला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
रांगोळीपासून AI आणि मानवी जीवनापर्यंत विविध विषयांवर विद्यार्थ्यांची कलात्मक अभिव्यक्ती; ९९ विद्यार्थ्यांचा सहभाग
भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ येथील कला, विज्ञान व पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ९ सप्टेंबर २०२६ रोजी ललित कला स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच सामाजिक, पर्यावरणीय आणि समकालीन विषयांकडे कलात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, कार्यालय प्रबंधक श्री. भगवान तायडे आणि कला मंडळ प्रमुख डॉ. प्रफुल्ल इंगोले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता
ललित कला स्पर्धांमध्ये रांगोळी, मेहंदी, व्यंगचित्र, कोलाज, इन्स्टॉलेशन, फोटोग्राफी, स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग आणि क्ले मॉडेलिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना समकालीन आणि सामाजिक विषय देण्यात आले होते. महिला सबलीकरण, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया, जेन झी, भारतीय संस्कृती व सण-उत्सव, सोशल मीडियाचे फायदे व तोटे, वन्यजीव संरक्षण, माझ्या स्वप्नातील भारत, पर्यावरणीय बदल, मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणाई, महागाई, भ्रष्टाचार, राजकारण तसेच AI आणि मानवी जीवन आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती साकारल्या.
विविध विषयांवरील विद्यार्थ्यांच्या कलात्मक मांडणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण ९९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शिक्षकांचे मोलाचे सहकार्य
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वंदना महाजन, डॉ. विद्या पाटील, प्रा. नयना चौधरी, डॉ. दिनानाथ पाठक, डॉ. सचिन राजपूत, प्रा. प्रणिता राणे, प्रा. सपना जंगले, डॉ. एस. के. राठोड, प्रा. नेहा महाजन, प्रा. गौतम भालेराव, डॉ. कविता पांडव, डॉ. प्रियंका महाजन, डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. ज्ञानेश्वर जावळे, प्रा. सुनील अडकमोल, डॉ. शलाका निकम आदींनी सहकार्य केले.
मान्यवरांनी केले परीक्षण
ललित कला स्पर्धांचे परीक्षण डॉ. रश्मी शर्मा, डॉ. गौरी पाटील, डॉ. स्मिता चौधरी, डॉ. ममता पाटील, डॉ. उमेश फेगडे, डॉ. विलास महिरे, डॉ. हर्षल पाटील, डॉ. एस. टी. धूम, डॉ. मनोज पाटील, डॉ. किरण वारके, डॉ. सचिन येवले, डॉ. दीपक पाटील आणि डॉ. मनोज जाधव आदींनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमामुळे महाविद्यालय परिसरात सर्जनशील आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक प्रश्न आणि समकालीन वास्तव मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे, याची प्रचिती विद्यार्थ्यांच्या कलाकृतींतून आली.
