कासोद्यात संत सेनाजी महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न
पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
कासोदा, ता. एरंडोल : येथील श्री संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी नाभिक समाजाच्या वतीने श्रीराम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच नृत्याच्या उत्साहात संत सेनाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
पालखी मिरवणुकीस श्रीराम मंदिर येथून सुरुवात झाली. बिर्ला चौक, मेन रोड, भाईगल्ली, दक्षिणमुखी हनुमान मंदिर मार्गे पुन्हा बिर्ला चौकातून मिरवणूक श्रीराम मंदिर येथे आणण्यात आली. मिरवणुकीदरम्यान समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर श्री संत सेनाजी महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी समाजातील महिला, पुरुष तसेच युवकांनी उत्स्फूर्तपणे व स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.
यानंतर नाभिक समाजाचे कार्यकर्ते सुधीर भिकन सोनवणे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. पूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांसह परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष विनोद ठाकरे, उपाध्यक्ष अजय निकम, सचिव गणेश ठाकरे, माजी अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, माजी उपाध्यक्ष वसंत सोनवणे यांच्यासह बाळा सोनवणे, जितेंद्र ठाकरे, अशोक ठाकरे, सुरेश ठाकरे, गोपाल देवरे, समाधान जाधव, सागर ठाकरे, गोपाल निकम, अशोक सोनवणे, धनराज सोनवणे, आबा देवरे, विजय निकम, अमर देवरे, सचिन देवरे, समाधान ठाकरे तसेच इतर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिश्रम घेतले.
