येवती येथे पारंपरिक वग्दी सण उत्साहात; पावसाच्या आगमनाने आनंदाला उधाण
अडीचशे ते तीनशे वर्षांची परंपरा कायम; बहिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
बोदवड प्रतिनिधी | सतीश बावस्कर : बोदवड तालुक्यातील येवती येथे सालाबादाप्रमाणे यंदाही पारंपरिक वग्दी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. अडीचशे ते तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या अनोख्या सणाला ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेष म्हणजे वग्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन झाल्याने ग्रामस्थांच्या आनंदात आणखी भर पडली.
येवतीचे ग्रामदैवत श्री बहिरोबा महाराज यांच्यावर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. वग्दीचा आशीर्वाद घेतल्यास संततीप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने सकाळपासूनच बहिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
संबळ-भारूडाच्या गजरात मानाच्या बैलगाडीची मिरवणूक
सायंकाळच्या सुमारास मानकऱ्यांनी संबळ, भारूड, गोंधळ, कीर्तन आणि डफाच्या सवाद्य गजरात मानाच्या बैलगाडीची गावातून प्रदक्षिणा काढली. यावेळी *‘बहिरोबा महाराज की जय’*च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि भाविकांचा उत्साह यामुळे गावातील वातावरण चैतन्यमय झाले होते.
मिरवणुकीनंतर मानाच्या बैलगाडीची विधिवत पूजा करण्यात आली.
सात दिवस आधीपासून तयारी; वग्दीचा मान विश्वनाथ धनगर यांना
दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वग्दीची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. या सोहळ्यासाठी गावात तब्बल सात दिवस अगोदरपासून तयारी सुरू केली जाते. यंदा वग्दीचा मान विश्वनाथ धनगर यांना मिळाला. पोळ्याच्या दिवसापासून वग्दी निरंकार उपवास धरतात आणि त्यानंतर या पारंपरिक धार्मिक सोहळ्याला सुरुवात होते.
अशी आहे वग्दीची अनोखी पारंपरिक पद्धत
वग्दी सणातील पारंपरिक पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यासाठी बैलगाडी सजवून गाडीमध्ये तराजूच्या काट्यासारखी एक काठी बांधली जाते. या काठीच्या एका बाजूला वग्दी म्हणून व्यक्ती बसवली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याच वजनाची वाळू बांधली जाते. त्यानंतर ही संपूर्ण रचना गोल फिरवली जाते आणि गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते.
अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली ही आगळीवेगळी परंपरा आजही येवती ग्रामस्थांनी श्रद्धा आणि उत्साहाने जपली आहे.
या धार्मिक सोहळ्यास कृउबा समिती संचालक रामदास पाटील, माजी सरपंच पुरुषोत्तम पाटील, रामदास श्रावणे, विठ्ठल जंगले, गजानन सावरीपगार, संजय जंगले, राजाराम जंगले, ज्ञानेश्वर जंगले, अशोक सावरीपगार, सिताराम वाघ, आत्माराम काटकर, निवृत्ती वाघ, दत्तू धनगर, शांताराम धनगर, विनोद विसाळे, राजू शिंदे, नारायण ठाकूर, बबलू ठाकूर, संतोष पाटील, विकास शिंदे, जितेंद्र ठाकूर, वासुदेव काटकर, प्रल्हाद वाघ, राजू सावरीपगार, डॉ. आनंद माळी, युवराज कांदेले, विनोद शिंदे, गजानन कुंभार, पवन भाकरे, विजय ठाकूर यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
पारंपरिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि ग्रामएकतेचे दर्शन घडविणारा हा वग्दी सोहळा उत्साहात पार पडला.
