संतोष भाऊ गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान
नळी वडगाव येथील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत केक कापून वाढदिवस साजरा; सामाजिक उपक्रमाचे जामखेड तालुक्यात कौतुक
अहिल्यानगर प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भाऊ गव्हाळे यांनी आपला वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

खर्डा परिसरालगत भूम तालुक्यातील नळी वडगाव येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ वृद्धाश्रमात’ जाऊन संतोष गव्हाळे यांनी तेथील आजी-आजोबांसोबत केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता किंवा कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वाटून घेण्याच्या उद्देशाने यावेळी भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार श्वेता गायकवाड, साळुंखे, समता ग्रुपचे सर्व सभासद, कार्यकर्ते तसेच संतोष गव्हाळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमाचे उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भरभरून कौतुक केले. वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाची सध्या जामखेड तालुक्यात चर्चा होत असून, संतोष गव्हाळे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.
“वृद्धांचा आशीर्वाद हीच माझ्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट”
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना संतोष गव्हाळे भावूक झाले. ते म्हणाले, “माझा वाढदिवस मी दरवर्षी नळी वडगाव येथील याच वृद्धाश्रमात येऊन अशाच पद्धतीने साजरा करणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांचा आदर करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे.”
वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद साजरा करण्याची संकल्पना समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवून संतोष गव्हाळे यांनी समाजाला एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे.




