जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस पाटील मेळावा उत्साहात
‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र व Reels स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३७ पोलीस पाटलांचा गौरव
पारोळा / सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला प्रतिबंध करणे तसेच विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात पोलीस पाटलांचे योगदान उल्लेखनीय आहे. या कार्याचा गौरव करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस पाटील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

११ सप्टेंबर २०२६ रोजी समर्थ लॉन्स, ता. जि. जळगाव येथे झालेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील पोलीस पाटलांना नवीन कायदे, कायदा व सुव्यवस्था, तसेच त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ‘पोलीस पाटील मार्गदर्शक पुस्तिकेचे’ अनावरण करण्यात आले.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे, जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सुरेश भोळे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. मंगेश चव्हाण, तसेच जिल्हाधिकारी, जळगाव आणि पोलीस अधीक्षक, जळगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३७ पोलीस पाटलांचा गौरव
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३७ पोलीस पाटलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने उपस्थित पोलीस पाटलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
‘विश्वासाची लेन्स’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र व Reels स्पर्धेतील विजेत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पोलीस दल आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासोबतच पोलिसांच्या कार्याची सकारात्मक बाजू समाजासमोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याबरोबरच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.




