‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ मोहिमेविषयी कार्यशाळा संपन्न
३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून असंसर्गजन्य आजारांचे निदान करण्यावर भर
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ या मोहिमेविषयी कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी डॉ. वाघ यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोहिमेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी माहिती देताना डॉ. वाघ यांनी सांगितले की, Non-Communicable Diseases (NCD) अर्थात असंसर्गजन्य आजारांबाबत सर्वेक्षण करून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ३० वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांची नोंदणी करण्यात येणार असून, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा तसेच कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी केली जाणार आहे.

ही मोहीम १ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. असंसर्गजन्य आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेणे, त्यांची आवश्यक तपासणी करणे तसेच त्यांना योग्य सल्ला व उपचार मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन डॉ. समाधान वाघ यांनी कार्यशाळेच्या प्रसंगी केले.
या कार्यशाळेस भडगाव तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




