यात्रेत सापडलेला मौल्यवान मोबाईल प्रामाणिकपणे केला परत!
शिवसैनिक अमोल व्यवहारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक; पावसात येऊ नका, उद्या या आणि मोबाईल घेऊन जा, असा दिला धीर
बोदवड, दि. १२ सप्टेंबर | प्रतिनिधी : नाडगाव येथे श्री भैरवनाथ बाबा यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी उत्साहात हजेरी लावली होती. यात्रेतील गर्दीत मूळचे शेगाव येथील रहिवासी व एअरटेल कंपनीत कार्यरत असलेले तेजस राजवैद्य यांचा मोबाईल हरवला. दरम्यान, हा मौल्यवान मोबाईल शिवसेना कार्यकर्ते अमोल व्यवहारे यांना सापडला.

मोबाईलवर आलेल्या फोनद्वारे राजवैद्य यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांचा मोबाईल हरवल्याचे व्यवहारे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन राजवैद्य यांना आपली ओळख करून दिली.

यावेळी अमोल व्यवहारे यांनी, “चंदूभाऊंचा शिवसैनिक म्हणून माझी परिसरात ओळख आहे. परिसरात तुम्ही माहिती घ्या. तुम्ही कालभैरव भक्त आहात, मी पण कालभैरव भक्त आहे. निश्चिंत राहा. सध्या पावसात येऊ नका; उद्या या आणि तुमचा मोबाईल घेऊन जा,” असे सांगत राजवैद्य यांना धीर दिला.

त्यानुसार आज दुपारी १२ वाजता तेजस राजवैद्य नाडगाव येथे आले. श्री भैरवनाथ महाराज मंदिरात ट्रस्टच्या सदस्य विमलताई धायडे व गजानन भाऊ पवार यांच्या हस्ते त्यांना मोबाईल सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्री भैरवनाथ बाबा ट्रस्टच्या वतीने नारळ देऊन तेजस राजवैद्य यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
गर्दीच्या यात्रेत सापडलेला मौल्यवान मोबाईल स्वतःकडे न ठेवता तो त्याच्या मूळ मालकाला परत करून अमोल व्यवहारे यांनी प्रामाणिकपणा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थित भाविक आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे, याचा प्रत्यय देणारी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.




