बसस्थानकात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती
डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे बस वाहकांना मार्गदर्शन; OTP, PIN, पासवर्ड आणि गोपनीय माहिती शेअर न करण्याचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव बसस्थानकात सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान बस वाहकांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तसेच संशयास्पद कॉल, मेसेज आणि लिंक कशा ओळखाव्यात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने कोणती पावले उचलावीत, याचीही माहिती देण्यात आली.

डिजिटल व्यवहार करताना सतर्कता आणि गोपनीयतेला सर्वाधिक महत्त्व आहे, यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. OTP, PIN, पासवर्ड तसेच बँक खात्याशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

सायबर गुन्हेगारांकडून विविध आमिषे दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याने कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा संशयास्पद फोनवर माहिती देण्यापूर्वी योग्य ती पडताळणी करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला.
या जनजागृती उपक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत बस वाहकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. बस वाहकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमासाठी Dr. R. B. Amale Sir यांचे मार्गदर्शन लाभले. डिजिटल युगात वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अशा जनजागृती उपक्रमांची गरज अधिक वाढली असून, नागरिकांनीही डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.




