नशिराबाद : द्वारका नगर परिसरातील महाकालेश्वर मंदिर चौफुलीवर वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली आहे. याबाबत स्वयंशोध फाउंडेशनच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे.
यापूर्वीही या चौफुलीवरील धोकादायक परिस्थितीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच १५ मार्च २०२६ रोजी स्थानिक वर्तमानपत्रांमध्येही या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाकालेश्वर मंदिर चौफुली ही परिसरातील महत्त्वाची वाहतूकदृष्ट्या वर्दळीची जागा असून येथे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने ये-जा करतात. वाहतुकीचा वेग नियंत्रित नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्मरणपत्रात चौफुलीच्या चारही दिशांना स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करण्यात आली असून, काम सुरू होण्याची निश्चित तारीख जाहीर करावी, अशीही विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने वेळेत कार्यवाही न केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अपघातास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
